AmravatiLatest NewsSocial News

अमरावतीत अत्याधुनिक सुजान सर्जिकल कॅन्सर हॉस्पिटल सेवेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; 100 बेड्सची सुविधा उपलब्ध

अमरावती

अमरावती शहराच्या आरोग्य क्षेत्रात आज एक ऐतिहासिक आणि दिलासादायक पर्व सुरू झाले आहे. कॅन्सर रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा असलेले सुजान सर्जिकल कॅन्सर हॉस्पिटल अधिकृतपणे सेवेत दाखल झाले असून, या भव्य हॉस्पिटलचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. छत्रीतलाव मार्गावर उभारण्यात आलेले हे हॉस्पिटल अमरावती जिल्ह्यासाठी मोठे वरदान ठरणार आहे.

अमरावती शहरातील छत्रीतलाव मार्गावर डॉ. राजेंद्रसिंह अरोरा यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सुजान सर्जिकल कॅन्सर हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. अंबानगरीच्या इतिहासात याआधी देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते कॅन्सर फाउंडेशनच्या माध्यमातून कॅन्सर उपचारांची पायाभरणी झाली होती. मात्र, गेल्या काही वर्षांत कॅन्सर रुग्णांची संख्या वाढत चालल्याने स्वतंत्र कॅन्सर हॉस्पिटलची गरज तीव्रतेने जाणवत होती.

ही गरज ओळखून अरोरा परिवाराने सुजान सर्जिकल कॅन्सर हॉस्पिटलची उभारणी केली आहे. या हॉस्पिटलमध्ये सध्या 100 बेड्सची अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना तसेच महात्मा गांधी आरोग्यदायी योजनेअंतर्गत कॅन्सर रुग्णांना मोफत उपचार मिळणार असल्याची माहिती डॉ. राजेंद्रसिंह अरोरा यांनी दिली.

उद्घाटन सोहळ्याला बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा, माजी खासदार नवनीत राणा, राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे, भाजप शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे, माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार कॅन्सर रुग्णांच्या मदतीसाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच सुजान सर्जिकल कॅन्सर हॉस्पिटलच्या भविष्यातील विकासासाठी शासन स्तरावर आवश्यक ती मदत देण्याबाबत सकारात्मक विचार असल्याचे त्यांनी नमूद केले.

अमरावती आणि परिसरातील कॅन्सर रुग्णांसाठी दर्जेदार उपचारांची सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button