भंडाऱ्यात खळबळ; पंचायत समिती उपसभापतींच्या कार्यालयात आत्मदहनाचा इशारा

७४ हजार रुपयांच्या थकबाकीवरून जेसीबी मालक आक्रमक; उपसभापतींवर गुन्हा दाखल
भंडारा, दि. — :
भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात एक खळबळजनक प्रकार समोर आला असून, ७४ हजार रुपयांच्या थकबाकीसाठी एका जेसीबी मालकाने पंचायत समितीच्या उपसभापतींच्या कार्यालयात सहकुटुंब आत्मदहनाचा इशारा दिल्याने प्रशासन आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
विरली खंदार येथील जेसीबी मालक नितेश मोटघरे यांचा पंचायत समितीचे उपसभापती प्रमोद मेंढे यांच्याशी आर्थिक वाद सुरू आहे. मोटघरे यांच्या म्हणण्यानुसार, मार्च २०२५ मध्ये मुरूम टाकण्याच्या कामासाठी त्यांनी उपसभापतींना आपली जेसीबी आणि ट्रॅक्टर भाड्याने दिली होती. काम पूर्ण झाल्यानंतरही ७४ हजार रुपयांचे बिल अद्याप अदा करण्यात आलेले नाही.
“आज देतो, उद्या देतो” असे सांगून सातत्याने टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप मोटघरे यांनी केला आहे. एवढ्यावरच न थांबता, ४ डिसेंबर रोजी पैसे मागितल्यावर फोनवरून शिवीगाळ व धमकी देण्यात आली, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकरणी अड्याळ पोलीस ठाण्यात उपसभापती प्रमोद मेंढे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून नितेश मोटघरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे. १५ जानेवारीपर्यंत थकबाकी न मिळाल्यास पंचायत समिती पवनी येथील उपसभापतींच्या कार्यालयातच सहकुटुंब आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी निवेदनात दिला आहे.
या घटनेमुळे पवनी तालुक्यात लोकप्रतिनिधी विरुद्ध सर्वसामान्य नागरिक असा संघर्ष चिघळल्याचे चित्र निर्माण झाले आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून या प्रकरणाचा तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
या प्रकरणामुळे



