अमरावती शहराला नवे पोलीस आयुक्त; राकेश ओला यांनी स्वीकारला पदभार

अमरावती, दि. 16 : अमरावती शहराचे नवे पोलीस आयुक्त म्हणून राकेश ओला यांनी आज अधिकृतपणे पदभार स्वीकारला. दुपारी ४ वाजून १५ मिनिटांनी पोलीस आयुक्तालयात त्यांचे आगमन झाले. विद्यमान पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्याकडून त्यांनी सूत्रे हाती घेतली.
पदभार स्वीकारताना डीसीपी शाम घुगे, गणेश शिंदे, रमेश धुमाल यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. चार्ज हस्तांतरणाची प्रक्रिया पोलीस आयुक्तालयात पार पडली.
पदभार स्वीकारल्यानंतर माध्यमांशी बोलताना पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी सांगितले की, “नागरिकांमध्ये पोलिसांवरील विश्वास वाढवणे हे माझे प्रमुख उद्दिष्ट असेल.” आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शहरात वाढत असलेल्या अमली पदार्थांच्या (ड्रग्स) व्यापारावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. Crime Prevention, Crime Detection आणि Law & Order हे महाराष्ट्र पोलीस दलाचे तीन आधारस्तंभ असून, त्याच तत्त्वांवर काम केले जाईल, असे त्यांनी नमूद केले.
राकेश ओला यांनी यापूर्वी विविध शहरांमध्ये विविध पदांवर सेवा बजावली असून, राजस्थानमध्ये ते सहा महिने न्यायाधीश म्हणूनही कार्यरत होते. अमरावती शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवणे हे त्यांच्यासमोर मोठे आव्हान असून, त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन तात्काळ कामाला सुरुवात केली आहे. यासोबतच वाहतूक समस्यांवरही विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.



