खुलताबादमध्ये भाजपचे दमदार शक्तिप्रदर्शन; फडणवीसांच्या सभेपूर्वी वातावरण तापले

छत्रपती संभाजीनगर, २४ नोव्हेंबर २०२५:
खुलताबाद नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने आज ताकदीचे शक्तिप्रदर्शन करत विरोधकांचे धाबे दणाणले. येत्या २५ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार असून, त्याच्या तयारीसाठी राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली शहरात भव्य मोटारसायकल आणि वाहन रॅली काढण्यात आली.
मुस्लिम बहुल लोकसंख्या असलेल्या खुलताबादच्या विविध भागांतून ही रॅली फिरली. शहरातील मुख्य बाजारपेठ, बसस्थानक परिसर आणि महत्त्वाच्या मार्गांवर ‘भारतीय जनता पार्टी जिंदाबाद’च्या घोषणा देत वातावरण दणाणले. रॅलीत भाजप जिल्हाध्यक्ष संजय खांबायते, नवनाथ पाटील बारगळ, रमेश नागे पाटील, सुरेश मरकड, प्रकाश वाकळे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार परसराम बारगळ आणि नगरसेवक पदांचे उमेदवार तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
नागरिक, युवक आणि महिलांनीही उत्साहाने सहभाग नोंदवल्याने रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे विरोधकांचा आत्मविश्वास कमी झाल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.
मंत्री अतुल सावे म्हणाले,
“खुलताबादमध्ये विजय आमचाच होणार, हे आजच्या रॅलीने सिद्ध केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभेनंतर या विजयी लढ्याला आणखी गती मिळेल.”
भाजपच्या या शक्तिप्रदर्शनामुळे खुलताबादमधील निवडणूक वातावरण आणखी तापल्याचे चित्र दिसत आहे.



