सात महिन्यांच्या तपासानंतर अवैध कट्टा विक्रेता आरोपीला अटक – खापरखेडा पोलिसांची कारवाई

खापरखेडा पोलिसांनी अवैध अग्नीशस्त्र प्रकरणातील फरार आरोपी रवि उर्फ जग्गा अशोक यादव (वय 20) याला तब्बल सात महिन्यांनी अखेर अटक करण्यात यश मिळवले आहे. अवैध देशी कट्टा विक्रीच्या रॅकेटमध्ये सहभागी असलेला आरोपी उत्तरप्रदेशात पळून गेलेला होता. पोलिसांनी सततच्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचत 20 नोव्हेंबरच्या मध्यरात्री त्याला ताब्यात घेतले.
कसे उघड झाले कट्टा रॅकेट
4 एप्रिल 2025 रोजी खापरखेडा पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, चनकापूर वस्तीमध्ये एक युवक अवैध शस्त्र बाळगून फिरत आहे. त्यानुसार पोलिसांनी तातडीने कारवाई करत सुरज उर्फ मुसा रमेश वरणकर (वय 25) याला पकडले.
त्याच्या अंगझडतीत पोलिसांना
- लोखंडी सिल्वर रंगाचा देशी कट्टा
- किंमत अंदाजे ₹25,000
जप्त करण्यात आला. या प्रकरणात पोउपनि आरती नरोटे यांनी फिर्याद दाखल केली आणि गुन्हा क्र. 279/25, कलम 3, 5, 25 भा.का. अंतर्गत तपास सुरू झाला.
फरार विक्रेत्यावर शोधमोहीम
तपासादरम्यान सुरजने कबुली दिली की कट्टा त्याने रवि उर्फ जग्गा यादव याच्याकडून विकत घेतला. मात्र रवि त्यावेळी पसार झाला होता आणि उत्तरप्रदेशात लपल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्याचा माग काढण्यास सुरुवात केली.
गुप्त माहितीवर मध्यरात्री सापळा
19 नोव्हेंबर रोजी गुप्त माहिती मिळाली की, जग्गा यादव उत्तरप्रदेशातून परत येऊन कवडस – पाटणसावंगी परिसरात फिरत आहे. त्यानुसार तपास पथकाने सापळा रचत मध्यरात्री कारवाई करून त्याला ताब्यात घेतले.
20 नोव्हेंबर रोजी रात्री 00.50 वाजता औपचारिक अटक करण्यात आली असून आरोपी पोलिस कस्टडीत आहे.
तपास सुरू
ही कारवाई खापरखेडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीष रूमकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून अवैध शस्त्र पुरवठा साखळीबाबत पुढील तपास सुरू आहे.



