रामटेकमध्ये भीषण अपघात; भरधाव कारच्या धडकेत नवविवाहिताचा मृत्यू, एक गंभीर जखमी

अंबाळा टर्निंग येथे दुर्घटना; कार चालक फरार, रस्त्यावरील खड्डे आणि प्रकाशव्यवस्थेअभावी नागरिकांचा संताप
रामटेक | प्रतिनिधी
नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील अंबाळा टर्निंग येथे बुधवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एका नवविवाहित तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला. भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेनंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अपघातप्रवण ठरलेल्या अंबाळा टर्निंगवरील रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास रामटेक–तुमसर मार्गावरील अंबाळा टर्निंगजवळील शिकारा हॉटेल परिसरात हा अपघात घडला. बोरडा सराखा येथील अमित लालचंद वाघ (वय २७) आणि रोहित लालचंद चौधरी (वय २१) हे पंचाळा येथून दुचाकीने आपल्या गावी परतत होते. त्याचवेळी तुमसरच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की दोघेही रस्त्यावर दूर फेकले गेले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ दोघांना उपजिल्हा रुग्णालय, रामटेक येथे दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) हलविण्याचा निर्णय घेण्यात आला.
मात्र, नागपूरकडे उपचारासाठी नेत असताना अमित वाघ यांचा वाटेतच मृत्यू झाला. तर जखमी रोहित चौधरी यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
जखमी युवक हा उपसरपंच तथा पत्रकार पंकज चौधरी यांचा नातेवाईक असल्याने त्यांनी नागपूर मेडिकलमधील रुग्णसेवक योगेश नासरे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर जखमीस तातडीने उपचार मिळावेत यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली. तसेच मनसर येथून वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी काकडे मॅडम यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मृत अमित वाघ यांचा अवघ्या चार महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. ते कुटुंबातील एकुलते एक पुत्र असल्याने त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, अंबाळा टर्निंग परिसर हा अपघातप्रवण म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी पुरेशी प्रकाशव्यवस्था नसणे, तसेच रस्त्यावर खड्डे असल्यामुळे वारंवार अपघात होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. येथे तातडीने स्ट्रीट लाईट बसविणे, रस्त्याची दुरुस्ती करणे आणि वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजना राबविण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या प्रकरणी रामटेक पोलिसांनी अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. फरार चालकाचा शोध घेण्याचे काम सुरू असून, अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास केला जात आहे.



