धामणगांव रेल्वेत गुरुनानक जयंतीचा भक्तिमय सोहळा

धामणगांव रेल्वे शहरात गुरुनानक देवजींची ५५६ वी जयंती मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. सिंधी समाज बांधव गेल्या सत्तर वर्षांपासून या उत्सवाचे आयोजन करत असून, या वर्षीही धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात भव्य कार्यक्रम पार पडले. बुधवार बाजार येथून गुरुनानक देवजींच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. शहरातील मुख्य रस्त्यांवरून मार्गक्रमण करत ही पालखी सिंधी कॅम्प येथील गुरुद्वाऱ्यात पोहोचली.
मिरवणुकीत पुरुष, महिला, युवक, युवती आणि लहान बालके मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. मार्गावरील नागरिकांनी रस्त्यावर उभे राहून गुरुनानक देवजींचे दर्शन घेतले आणि भक्तिभावाने वंदन केले. सिंधी कॅम्प येथील गुरुद्वाऱ्यात सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन गुरुनानक देवजींच्या चरणी सुख, समृद्धी, शांती आणि देशाच्या एकतेसाठी प्रार्थना केली. कार्यक्रमानंतर सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या अनेक दशकांपासून चालत आलेली ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धा आणि उत्साहाने साजरी होत असून, धर्म, प्रेम आणि ऐक्याचा संदेश देणारा हा उत्सव संपूर्ण समाजासाठी आदर्श ठरतो आहे.



