भरधाव ट्रक-दुचाकीच्या जोरदार धडकेत दोन मित्रांचा जागीच मृत्यू

दिनांक ०३ नोव्हेंबरच्या रात्री पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. फिर्यादी कोमल ओमप्रकाश सोनोने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा लहान भाऊ दिपेन ओमप्रकाश सोनोने वय २४ वर्ष, रा. साईनगर पारडी, हा आपल्या मित्र हर्षवर्धन गोपाल बोहरा (वय ४५) याच्यासह बजाज प्लेटिना दुचाकीने आर्या यार्ड समोरील बाराद्वारीकडे जात होता. तेवढ्यात, समोरून येणाऱ्या ट्रकच्या चालकाने भरधाव वेगात व निष्काळजीपणे वाहन चालवून दोघांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेनंतर दोघेही गाडीसह खाली पडून गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तात्काळ त्यांना उपचारासाठी मेयो हॉस्पिटल येथे दाखल केले. मात्र डॉक्टरांनी हर्षवर्धन बोहरा यास तपासून मृत घोषित केले. दरम्यान, जखमी अवस्थेत असलेल्या दिपेन सोनोने याचा उपचार सेवन स्टार हॉस्पिटलमध्ये सुरू होता. परंतु दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजता डॉक्टरांनी त्यालाही मृत घोषित केलं. या दुर्दैवी घटनेनंतर फिर्यादीने पारडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोउपनि. चालूरकर यांनी आरोपी ट्रक चालकाविरुद्ध भा.दं.वि. कलमसह मोटर व्हेईकल अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. सध्या पुढील तपास पोलीस करत आहेत.



