बस स्थानकावर सुरक्षारक्षकाच्या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू

भोकरदन शहरातील बस स्थानक परिसरात आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. मृत व्यक्तीचे नाव मजीद खा अनवर खा वय ६० वर्षे, रा. कठोरा बाजार, ता. भोकरदन, जि. जालना असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मजीद खा अनवर खा हे भोकरदन शहरात बँकेचे काही कामकाज पूर्ण करून बस स्थानकावर परत जाण्यासाठी आले होते. त्याचवेळी बस स्थानकावर तैनात असलेला कंत्राटी सुरक्षा रक्षक सुरेश गणपत वनारसे, रा. फतेपूर, ता. भोकरदन, याने या वृद्धावर संशय घेतला. कुठलाही विचार न करता सुरक्षारक्षकाने वृद्धाला धक्का देत खाली पाडले आणि हातात असलेल्या दांडक्याने निर्दयपणे मारहाण केली. या घटनेत वृद्ध गंभीर जखमी झाले. घटनेचे साक्षीदार असलेल्या प्रवाशांनी आणि तरुणांनी तत्काळ हस्तक्षेप करून वृद्धाला वाचवले आणि त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्याचा सल्ला दिला.
मात्र उपचारासाठी जात असतानाच रस्त्यातच त्या वृद्धाचा मृत्यू झाला. ही बाब समजताच परिसरात संतापाची लाट उसळली. भोकरदन पोलीस ठाण्याबाहेर शेकडो नागरिकांनी गर्दी केली आणि संबंधित सुरक्षारक्षकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली असून, आरोपी सुरक्षारक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही घटना पुन्हा एकदा प्रशासनावर आणि खाजगी सुरक्षारक्षकांच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करते. शहरातील नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.



