Latest NewsMaharashtra

कोजागरी ते कार्तिकी पौर्णिमा पर्यंत चाललेली काकडा आरतीची परंपरा

रावेर तालुक्यातील वाघोड गाव — जिथे श्रद्धा, भक्ती आणि एकता या तीन गोष्टींचा सुंदर संगम दिसतो. कोजागरी पौर्णिमेपासून सुरू झालेली काकडा आरती यावर्षीही मोठ्या उत्साहात पार पडली. दररोज पहाटे पाच वाजता गावातील नागरिक श्री कुंवरस्वामी महाराज मंदिरात एकत्र जमतात. टाळ-मृदंग, झांजा, चिपळ्या आणि घंटानादाच्या गजरात संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघतो. ‘जय जय राम कृष्ण हरी’ या अभंगाच्या गजरात आरती सुरू होते आणि गावाच्या गल्लीबोळातून हरिनामाचा गजर घुमत राहतो. युवक, महिला आणि वयोवृद्ध सर्वजण अनवाणी पायांनी नगरभ्रमण करतात. आरतीदरम्यान गावातील प्रमुख मंदिरांमध्ये भक्तिमय गीतं, पुष्पांजली आणि आरती सादर केली जाते. पांढऱ्या सुतापासून तयार केलेला ‘काकडा’ हनुमान मंदिरात पेटवला जातो, आणि तो प्रसाद म्हणून सर्व भक्तांना वितरित केला जातो. कार्तिकी पौर्णिमेला “कंठीं धरीला कृष्ण मनी” या अभंगाने या परंपरेची समाप्ती झाली.
गावात सडासारवण, रांगोळ्या आणि फुलांनी सजलेली अंगणे या परंपरेचं सौंदर्य अधिक खुलवत होती. संपूर्ण गावकऱ्यांच्या सहभागाने ही काकडा आरती केवळ धार्मिक विधी न राहता गावाच्या सांस्कृतिक एकतेचं प्रतीक ठरली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button