International NewsLatest News

पॅरिसमधील लूव्र संग्रहालयातून नेपोलियन काळातील अमूल्य दागिने चोरीला; संग्रहालय तात्पुरते बंद

पॅरिस : जगप्रसिद्ध लूव्र संग्रहालयातून नेपोलियन आणि फ्रेंच महाराणीच्या काळातील ऐतिहासिक व अमूल्य दागिने चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संग्रहालय आज (१९ ऑक्टोबर) दिवसभरासाठी तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहे. चोरीला गेलेल्या दागिन्यांची अचूक किंमत अद्याप निश्चित करण्यात आलेली नसली तरी ही घटना फ्रान्समधील अलीकडच्या काळातील सर्वात मोठ्या सांस्कृतिक चोर्यांपैकी एक मानली जात आहे.

फ्रान्सचे गृहमंत्री लॉरेंट नुनेज यांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी हायड्रॉलिक शिडी आणि मालवाहू लिफ्टचा वापर करून संग्रहालयात प्रवेश केला. लूव्रच्या दर्शनी भागात सध्या सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी मिळालेल्या सुरक्षेच्या त्रुटींचा फायदा घेत चोरटे ‘अपोलो गॅलरी’मध्ये पोहोचले. त्यांनी खिडक्या तोडून आत प्रवेश केला आणि तेथून नेपोलियन आणि महाराणीच्या दागिन्यांच्या संग्रहातील नऊ मौल्यवान तुकडे चोरले.

या घटनेनंतर पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांनी तातडीने तपास सुरू केला असून, संग्रहालय प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव लूव्र दिवसभरासाठी बंद ठेवले आहे. फ्रान्सच्या सांस्कृतिक मंत्री रचिदा दाती यांनी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, “आज सकाळी अपवादात्मक कारणांमुळे लूव्र संग्रहालय बंद ठेवण्यात आले असून, या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी चौकशी सुरू आहे.”

लूव्र संग्रहालय हे मोनालिसा चित्रासह जगातील अनेक ऐतिहासिक व कलात्मक कलाकृतींसाठी ओळखले जाते. दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देतात. अशा ठिकाणी सुरक्षेची घातलेली झोप आणि होणारी सांस्कृतिक हानी यावरून प्रशासनाची जबाबदारी अधोरेखित होत आहे. या घटनेमुळे संग्रहालय प्रशासनासह फ्रेंच सुरक्षा यंत्रणांवर तीव्र टीका होण्याची शक्यता आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button