पावसाने साथ सोडली, शेतकऱ्याने अडीच एकर सोयाबीन पेटवले! नांदेडच्या दाभडमधील हृदयद्रावक प्रकार

नांदेड : गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने नांदेड जिल्ह्यातील शेतीपिकांना मोठा फटका बसला आहे. पावसाअभावी सोयाबीनचे पीक करपून हातातून गेल्याने हतबल झालेल्या शेतकरी दांपत्याने अडीच एकर शेतातील सोयाबीनचे पीक पेटवून दिल्याची घटना अर्धापूर तालुक्यातील दाभड येथे घडली.
दाभड येथील शेतकरी वैजनाथ सूर्यवंशी आणि त्यांच्या पत्नी जयश्री सूर्यवंशी यांनी आपल्या अडीच एकर शेतात सोयाबीनची लागवड केली होती. मात्र पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने पिकाला आवश्यक पाणी मिळाले नाही. परिणामी उभे सोयाबीन पीक करपले आणि उत्पादनाची अपेक्षा जवळपास संपुष्टात आली.
पिकाची ही अवस्था पाहून हतबल झालेल्या शेतकरी दांपत्याने अखेर आपल्या शेतातील करपलेले सोयाबीन पीक पेटवून दिले. पीक पेटवत असताना महिला शेतकरी जयश्री सूर्यवंशी यांच्या डोळ्यांत अश्रू आले. मेहनत, बियाणे, खत आणि मशागतीवर केलेला खर्च पाण्याअभावी वाया गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
पावसाअभावी पीक हातातून गेल्याने आता कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न शेतकरी दांपत्यासमोर उभा राहिला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे जगणे कठीण झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांवर परिणाम झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. सोयाबीनसह इतर पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र आहे.
अडीच एकरातील पीक पेटवून देत सूर्यवंशी दांपत्याने आपल्या परिस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी आणि नांदेड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
आता या घटनेची प्रशासनाकडून दखल घेतली जाते का, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे होऊन त्यांना तातडीची मदत मिळते का, याकडे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.



