Uncategorized

चोरी गेलेले 171 मोबाईल परत मूळ मालकाच्या हाती

अमरावती – अमरावती शहर पोलीस आयुक्तालयात गुरुवारी सायबर जनजागृती अभियानाच्या अंतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात १७१ चोरी गेलेले मोबाईल ज्यांची किंमत सुमारे २६ लाख ३० हजार रुपये इतकी आहे, हे सर्व मोबाईल पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आले. या उपक्रमामुळे शेकडो नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. सायबर पोलिसांनी अथक प्रयत्न करून विविध जिल्ह्यांतून आणि राज्यांबाहेरून हे मोबाईल शोधून काढले. हा उपक्रम सायबर जनजागृती महिना या अभियानाचा एक भाग होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत, ३ ऑक्टोबर रोजी मुंबईतील पोलीस महासंचालक कार्यालयात या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर, अमरावती पोलीस आयुक्तालयात देखील विविध जनजागृती कार्यक्रम आणि उपक्रम राबविण्यात आले.
कार्यक्रमाला उपायुक्त रमेश धुमाळ, सहायक पोलीस आयुक्त शाम घुगे, पोलीस निरीक्षक महेंद्र अंभोरे, अनिकेत कासार, तसेच सहायक पोलीस निरीक्षक प्रियंका कोटावार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान सायबर सुरक्षा संदर्भात जनजागृतीपर चलाचित्रफीती दाखविण्यात आल्या, तसेच नागरिकांमध्ये माहितीपर पत्रके वाटप करण्यात आली. पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी नागरिकांना सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले.
त्यांनी सांगितले की, “ऑनलाईन आर्थिक फसवणूक, महिला व बालकांविरुद्ध होणारे अपराध, तसेच सोशल मीडियावर होणाऱ्या धोका यापासून स्वतःला व आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवणे अत्यावश्यक आहे.”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button