कोराडीतील दुर्दैवी अपघातात कांदा-बटाटा विक्रेत्याचा मृत्यू

नागपूर – नागपूर शहरातील कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतकाचे नाव सुधीर माहादेव माटे (वय ५१, रा. पांजरा, नागपूर) असे आहे. ते कांदा आणि बटाट्यांची विक्री करण्याचे काम करत होते. दररोजप्रमाणे आज सकाळीही ते कळमणा मार्केटमध्ये माल खरेदी करण्यासाठी गेले होते. त्यानंतर डिओ वाहन (क्र. MH-49 AY 6078) ने परत येत असताना कोराडी नाका ते पांजरा मार्गावर रॉंग साइडने जात असताना कोराडी नाका डायव्हरजनजवळ समोरून येणाऱ्या मोटारसायकलशी त्यांची धडक झाली. या धडकेनंतर सुधीर माटे खाली पडले आणि त्याच वेळी दुसऱ्या वाहनाच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती मिळाली आहे.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला माहिती दिली. मात्र, रुग्णालयात नेण्यापूर्वीच सुधीर माटे यांनी प्राण सोडले. मृतदेह मेयो हॉस्पिटल, नागपूर येथे हलविण्यात आला असून पुढील तपास परी.पो.उप.नि. भुरलाल चव्हाण हे करत आहेत. फिर्यादी म्हणून मेघा सुधीर माटे (वय ३८ वर्ष) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यांनी सांगितले की, त्यांच्या पतीसोबत घरगुती वादांमुळे ते काही महिन्यांपासून वेगळे राहत होते. मात्र, अधूनमधून ते घरी भेट देत असत आणि त्यांच्या कांदा-बटाट्यांच्या विक्रीच्या व्यवसायातून घर चालवत होते. या घटनेनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.



