घरफोडीचा आरोपी ताब्यात, चोरी केलेला मुद्देमाल जप्त

वाठोडा पोलीस ठाण्याच्या गुन्हेशाखा युनिट क. ३ व ४ ने केलेल्या कारवाईत घरफोडी करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले आहे. दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी, रामकृष्ण नगर, दिघोरी येथे राहणारे पंकज मोहाळे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यांच्या घरातील लॉकरमधील सोन्याचे दागिने, एकूण १,५७,५०० रुपयांचा मुद्देमाल, चोरट्यांनी चोरी करून नेला होता. गुन्ह्याचे तपास करताना, पोलीसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी अमोल चाफेकर, वय २५, रा. मोचीपूरा, ठक्करग्राम, पाचपावली, नागपूर यास ताब्यात घेतले. आरोपीने चोरीची कबुली दिली आणि सांगितले की, त्याने वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी २ घरफोडी केले आहेत, एकूण ३ घरफोडीचे गुन्हे त्यांनी कबुल केले. पोलीसांनी आरोपीकडून २,५०० रुपयांचे रोख, सोन्याचे दागिने, मोबाईल फोन, घड्याळ आणि चोरीसाठी वापरलेली मोपेड गाडी असा एकूण १,९०,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर आरोपीस मुद्देमालासह वाठोडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.”



