BeedLatest NewsMaharashtra

“मूळशी पॅटर्नची थरारक झलक! वाढदिवसाच्या दिवशी व्यापाऱ्यावर लोखंडी कत्तीने हल्ला”

बीड : बीडच्या अंबाजोगाई शहरालगत असलेल्या मगरवाडी येथे जुन्या प्रकरणाच्या वादातून एका तरुण व्यापाऱ्यावर लोखंडी कत्तीनं वार करत हल्ला झाल्याची घटना घडली आहे. गोपाल जाधव हे आपल्या दुकानाबाहेर बसले असताना जयपाल आशोक माने व त्याचा साथीदार निशांत विष्णु जागिर या दोघांनी हा हल्ला केला. यावेळी माने याने कपड्यात लपवलेली लोखंडी कत्ती काढून जाधव याच्यावर हल्ला केला. डावा हात पुढे केल्याने या हल्ल्यात ते बचावले मात्र जाधव यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. यावेळी जाधव यांनी कसाबसा जीव वाचवत तिथून पळ काढला.

तुझा मूळशी पॅटर्न केल्याशिवाय तुला जिवंत सोडणार नाही
यावेळी दोन्ही आरोपींनी मोटारसायकलवरून पाठलाग करत “आज माझा वाढदिवस आहे, तुझा मूळशी पॅटर्न केल्याशिवाय तुला जिवंत सोडणार नाही,” अशी यावेळी धमकी दिली. जाधव याने गावातील मित्राच्या घरी आश्रय घेत अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाणे गाठल्याने त्याचे प्राण वाचले. जखमी जाधव याला अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी दोन जणांविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास अंबाजोगाई ग्रामीण पोलीस करत आहेत. दरम्यान,आरोपी जयपाल माने यासही सायंकाळी काही व्यक्तींनी बेदम मारहाण केल्याने तो गंभीर जखमी असून त्याच्यावर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button