Latest NewsMaharashtraSangli

बचत गटाच्या 1200 रुपयांतून सुरुवात; ‘सरस’ ब्रँडच्या माध्यमातून संगिता कोळींचा कोट्यवधींचा यशस्वी प्रवास!

सांगली : वाळवा तालुक्यातील कारंदवाडी येथील संगिता रामचंद्र कोळी यांनी बचत गटाच्या केवळ 1,200 रुपयांच्या कर्जातून व्यवसायाची सुरुवात करत, आज वार्षिक 25 लाख रुपयांहून अधिक उलाढालीचा “सरस” ब्रँड उभा केला आहे. त्यांच्या मेहनतीचा आणि चिकाटीचा प्रवास हा ग्रामीण भागातील महिलांसाठी प्रेरणादायी ठरतो आहे.

संगिता कोळी यांचा प्रवास स्वीट कोकम, काजू, बेदाणा आणि सुका मेवा या उत्पादनांभोवती फिरतो. सुरुवातीला आठवडी बाजारात भाजी विकणाऱ्या संगिता कोळी यांनी परिस्थितीवर मात करत महाबळेश्वर ते सांगली अशा प्रवासांतून आपला व्यवसाय उभारला.

बचत गटाचा ‘सरस’ प्रभाव

2003 साली त्यांनी ज्ञानदा महिला स्वयंसहायता बचत गट जॉइन केला. याच गटाच्या मदतीने घेतलेल्या कर्जातून त्यांनी काजू प्रक्रियेचा प्रकल्प सुरू केला, जो सांगली जिल्ह्यातील पहिलाच नोंदणीकृत काजू प्रक्रिया प्रकल्प होता. यानंतर “सरस” या नावाने ब्रँड उभा राहिला, ज्याचे उत्पादन आज अनेक राज्यांमध्ये पोहोचले आहे.

प्रत्येक अडचणीतून शिकून उभारले यश

शेतीवर काम, बाजारात भाजी विक्री, एकाच वेळी दोन लहान मुलांना सांभाळत व्यवसायाची चुणूक दाखवणाऱ्या संगिता कोळी यांनी घाटातून वाहन चालवले, विमानाने कच्चा माल खरेदीसाठी प्रवास केला, आणि विक्रीसाठी महाबळेश्वरची बाजारपेठ निवडली. त्यांच्या मेहनतीची फळं म्हणून आज त्यांचा ब्रँड बाजारपेठेत चांगलीच ओळख निर्माण करत आहे.

समाज upliftment ला दिली दिशा

स्वतःचा व्यवसाय वाढवत असतानाच त्यांनी १० ते १५ महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. माविम, नाबार्ड यांच्या पाठबळामुळे त्यांनी अनेक प्रदर्शनांमध्ये सहभाग घेतला. या माध्यमातून इतर महिलांनाही त्यांनी व्यवसाय कौशल्ये शिकवली.

समाजकार्याचाही समांतर प्रवास

‘महाबळेश्वर ट्रेकर’ संघटनेच्या त्या एकमेव महिला सदस्य असून, आपत्तीच्या काळात पोलिस व प्रशासनाला विनामोबदला मदत केली आहे. सामाजिक जाणीव, नेतृत्वगुण आणि संघटन कौशल्य याचे उत्तम उदाहरण म्हणजे संगिता कोळी.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button