ढालकी धबधबा परिसरात बिबट्या वाघाचा संचार

जालना – जालना जिल्ह्यातील धावडा गावाजवळील निसर्गसौंदर्याने नटलेले ढालकी धबधबा आणि सिडीघाट धबधबा आता पर्यटकांसाठी प्रसिद्ध स्थळ बनले आहे. मात्र, या परिसरात बिबट्या वाघाचा संचार झाल्याचे चित्र समोर आले आहे. जामनेर तालुक्यातील गोद्री ते धावडा-मेहेगाव रस्ता परिसरात काही दिवसांपासून बिबट्या वाघाचे दर्शन नागरिकांनी घेतले आहे. रोडच्या कडेला बसलेल्या या वाघामुळे पर्यटक तसेच स्थानिक नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
वनविभागाचे जामनेर आरएफओ यांनी सांगितले की, या माहितीवरून त्यांनी तातडीने कर्मचारी घटनास्थळी पाठवून बंदोबस्त करणार आहेत. तसेच, पर्यटक आणि नागरिकांना जनजागृती करून कोणावर हल्ला होणार नाही याची दक्षता घेतली जाईल.
पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनी वनविभागाला मागणी केली आहे की, या परिसरात येऊन वाघाचा शोध घेऊन त्याला सुरक्षित पद्धतीने जेरबंद केले जावे. तसेच, ढालकी धबधबा आणि सिडीघाट धबधबा या निसर्गसौंदर्य स्थळांवर सोयीसुविधा सुधाराव्यात. हा परिसर जालना, जळगाव, खांदेश, छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाणा जिल्ह्यांच्या सीमेवर येतो. या भागात दररोज हजारो पर्यटक व भाविक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येतात, तर शाळा सहलीसाठी विद्यार्थ्यांना देखील येथे भेट देणे आवडते.
परंतु, रोड अरुंद आणि खराब असल्यामुळे टू व्हीलर व फोर व्हीलर वाहनांना डबल गाडीपास होत नाही. स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे की, जिल्हाप्रशासन या रस्त्याची दुरुस्ती करून सुरक्षित मार्ग उपलब्ध करावे. वनविभागाने नागरिकांना सुचित केले आहे की, जंगलामध्ये एकटे फिरणे टाळावे आणि घबराटीच्या परिस्थितीत सावध राहावे. या मार्गदर्शनामुळे पर्यटक सुरक्षित राहतील आणि निसर्गाचा आनंद घेऊ शकतील.



