नागपुरात एमडी ड्रग्जविरोधात मोठी कारवाई; १५ ग्रॅम अमली पदार्थासह एक आरोपी अटकेत

लक्कडगंज परिसरातून ₹२.८० लाखांचा मुद्देमाल जप्त; एक आरोपी फरार, शोधमोहीम सुरू
नागपूर | प्रतिनिधी
नागपूर शहरात अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत १५ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) सदृश्य अमली पदार्थासह एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत अमली पदार्थ, मोबाईल फोन आणि दुचाकीसह सुमारे ₹२ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणातील आणखी एक आरोपी फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला लक्कडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताजुद्दीन बाबा दर्गा गल्ली परिसरात अमली पदार्थांची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मध्यरात्री सापळा रचून कारवाई केली.
या कारवाईदरम्यान मोहम्मद सोहेल अब्दुल गफ्फार शेख (वय २९) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या झडतीत १५ ग्रॅम एमडी सदृश्य पावडर जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची अंदाजे किंमत ₹१ लाख ५० हजार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याशिवाय आरोपीकडून एक मोबाईल फोन आणि पांढऱ्या रंगाची सुजुकी बर्गमन दुचाकीही जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे ₹२ लाख ८० हजार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणात मोहम्मद नौशाद इम्रान मलिक हा दुसरा आरोपी फरार असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वीही एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हे नोंद असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २२(ब) आणि २९ अन्वये लक्कडगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास सुरू आहे.
नागपूर पोलिसांनी शहरातील अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात कारवाई अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला असून, अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे.



