पुण्यातील रस्त्यावर धक्कादायक शोध – ५ महिन्यांचा मृत बाळ

पुणे : पुण्यातील खेड शिवापूर येथील शिवाजीनगर परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. शिंदे वस्तीकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्याजवळ अंदाजे ५ महिन्यांचा बेवारस अर्भक मृतावस्थेत आढळला, ही माहिती मिळताच परिसरात मोठी खळबळ उडाली.
आशा सेविका अनिता घोडेकर यांनी अर्भक रस्त्याच्या कडेला पडल्याचे पाहून तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई आणि इतर अधिकारी दाखल झाले. अर्भक ताब्यात घेऊन खासगी रुग्णालयात नेले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीदरम्यान सांगितले की अर्भक आधीच मृत आहे.
याप्रकरणी आशा सेविका अनिता घोडेकर यांनी राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू करत आहेत. पोलीस घटनास्थळाचे सर्व तपशील गोळा करत आहेत, तर अर्भकाचा मृत्यू कसा झाला आणि त्यामागील कारणे शोधण्यासाठी तपास सुरू आहे.



