चिखलदरा: टेंभ्रूसोंडा गावात धोकादायक रस्ते आणि खचलेले पूल; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गावकरी संतापले

अमरावती: अमरावती जिल्ह्यातील आदिवासीबहुल चिखलदरा तालुक्यातील टेंभ्रूसोंडा गावात रस्ते आणि पुलांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, यामुळे अपघातांची मालिका सुरू झाली आहे. स्थानिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या गावातील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत, ज्यामुळे वाहनचालक आणि पायी चालणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास होत आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे, गावातील नाल्यांवर असलेले पूल पूर्णपणे खचले आहेत. यामुळे दररोज लहान-मोठे अपघात घडत आहेत आणि जखमींची संख्या वाढत आहे. विशेषतः पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होते, कारण पाणी रस्त्यावर आल्यामुळे रस्ता कुठे आहे याचा अंदाज घेणे कठीण होते.
प्रशासनाचे दुर्लक्ष, गावकऱ्यांची उपेक्षा
या समस्येबद्दल ग्रामस्थांनी स्थानिक सरपंच शैलेश गावंडे आणि ग्रामपंचायत सचिव निलेश उईके यांच्याकडे अनेकदा तक्रारी केल्या. मात्र, त्यांच्याकडून कोणतीही कारवाई झाली नाही. यानंतर गावकऱ्यांनी पंचायत समिती चिखलदराकडे धाव घेतली, परंतु त्यांनीही या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले. यामुळे गावकरी हताश झाले आहेत आणि ‘आपलं ऐकणारं कोणीच नाही का?’ असा प्रश्न विचारत आहेत.
विद्यार्थ्यांसह मजुरांचा जीव धोक्यात
या खराब रस्त्यांमुळे आणि खचलेल्या पुलांमुळे शाळेत जाणाऱ्या मुलांना तसेच कामावर जाणाऱ्या मजुरांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. स्थानिक प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
टेंभ्रूसोंडा गावातील या गंभीर समस्येवर प्रशासनाने त्वरित लक्ष घालून रस्ते आणि पुलांची दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा आहे. गावकऱ्यांच्या जीवनाशी होत असलेला हा खेळ थांबवण्यासाठी तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे.



