Amravati

अमरावती: प्रकल्प संचालक प्रीती देशमुख यांच्या विरोधात कंत्राटी कर्मचाऱ्यांचा एल्गार; ‘देशमुख हटाओ’ची मागणी

अमरावती: जिल्हा परिषद प्रकल्प संचालक प्रीती देशमुख यांच्यावर मानसिक छळ केल्याचा आरोप करत अमरावतीमध्ये शेकडो कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात सुमारे १२० कर्मचारी सहभागी झाले आहेत. या कर्मचाऱ्यांनी देशमुख यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आंदोलनाचे कारण आणि वाढता रोष
कर्मचाऱ्यांचा आरोप आहे की, प्रकल्प संचालक प्रीती देशमुख यांच्याकडून त्यांना सतत मानसिक त्रास दिला जात आहे. या त्रासाला कंटाळून उमेद जिल्हा व्यवस्थापक शीतल गर्गेलवार यांनी एका आठवड्यापूर्वी गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर कर्मचाऱ्यांमधील असंतोष अधिक वाढला असून, आता शेकडो कर्मचारी देशमुख यांच्या विरोधात एकवटले आहेत.

सोमवारपासून सुरू झालेल्या या आंदोलनात सर्व कर्मचाऱ्यांनी “प्रीती देशमुख हटाओ” अशा घोषणा देत ‘लेखणी बंद’ आंदोलन सुरू केले आहे. कर्मचारी कार्यालयातील कामकाजावर बहिष्कार टाकत आहेत.

राजकीय नेत्यांना निवेदने, तरीही कारवाई नाही
याआधीही अनेक कर्मचाऱ्यांनी आमदार रोहित पवार, आमदार रवी राणा, खासदार बळवंत वानखडे, तसेच महसूल मंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देऊन या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली होती. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संताप आहे. “प्रीती देशमुख यांची पाठराखण कोण करत आहे?” असा प्रश्न आता आंदोलकांकडून विचारला जात आहे.

राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा
जर प्रशासनाने या प्रकरणात तातडीने लक्ष देऊन कारवाई केली नाही, तर हे आंदोलन केवळ अमरावतीपुरते मर्यादित न राहता संपूर्ण राज्यात पसरवले जाईल, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. या आंदोलनामुळे अमरावती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयात तणावाचे वातावरण आहे. आता प्रशासन यावर काय भूमिका घेते आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या जातात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button