Latest NewsYavatmal

राज्यमंत्र्याच्या नावाच्या ट्रकमधून दारूची अवैध विक्री; पुसद पोलिसांची मोठी कारवाई, सात जणांना अटक

यवतमाळ : परभणी जिल्ह्यातील जिंतूरच्या भाजप आमदार तथा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर (साकोरे) यांचे नाव लिहिलेल्या ट्रकमधून दारूची अवैध विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुसद शहर पोलिसांनी गुरुवारी सकाळी केलेल्या धडक कारवाईत या ट्रकमधून आणलेली दारू अवैधपणे विकताना सात जणांना ताब्यात घेतले आहे.

पुणे येथील विश्वास इंटरप्राइजेस आणि ट्रान्सपोर्टच्या मालकीचा ‘एमएच १२, वायबी ००४८’ क्रमांकाचा हा ट्रक पुणे येथील हडपसरमधून ४० लाख रुपये किमतीची ‘ग्रीन लेबल’ दारू घेऊन नागपूरकडे निघाला होता. एनडीजे लिक्विड्स प्रायव्हेट लिमिटेड येथे ही दारू पोहोचवणे अपेक्षित होते. मात्र, ट्रकचालक नागपूरकडे न जाता थेट पुसद शहरात पोहोचला. माहूर मार्गावर एका मोकळ्या ठिकाणी हा ट्रक उभा करून त्यातून दारूची अवैध विक्री सुरू होती.

पुसद पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तात्काळ कारवाई केली. तीन दुचाकींवरून आलेल्या सहा तरुणांनी ट्रकमधून दारूच्या सहा पेट्या खरेदी केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी मनीष ईश्वरू सुरुळे (१९, रा. वाडी नामदार, ता. पैठण, जिल्हा संभाजीनगर, हल्ली मुक्काम कारेगाव, पुणे), राजेश्वर मधुकर पवार (२३), सचिन उद्दल चव्हाण (२३), सचिन सावन चव्हाण (२४), गोकुळ बाबूसिंग चव्हाण (२३), विक्रम बळीराम जाधव (२०) (सर्व रा. तुळशीनगर, ता. महागाव) आणि प्रवीण दत्ताजी जोहरे (३०, रा. वाई गौळ, ता. मानोरा, जि. वाशीम) यांना ताब्यात घेतले.

विशेष म्हणजे, या ट्रकावर ‘राज्यमंत्री मेघनादीदी साकोरे बोर्डीकर’ असे ठळकपणे लिहिलेले आहे. ट्रकचालकाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ट्रकमालक कोहकाडे हे राज्यमंत्री बोर्डीकर यांचे नातेवाईक आहेत. या प्रकरणी कोहकाडे यांना चौकशीसाठी बोलावल्याचे पुसद शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सेवानंद वानखेडे यांनी सांगितले.

हा ट्रक बुधवारीच नागपूर येथे पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, गोकुळ चव्हाण याच्या माध्यमातून चालकाने हा ट्रक पुसद येथे आणून दारू विकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या दारूच्या सर्व पावत्या आणि कर भरणा आदी कागदपत्रे योग्य आहेत. मात्र, चालकाने त्यातील दारूच्या १० पेट्या अवैधपणे विकल्या. पैशांची गरज असल्याने हा प्रकार केल्याचे चालकाने पोलिसांना सांगितले.

या कारवाईत पोलिसांनी ४० लाख रुपये किमतीची दारू, ट्रक, तीन दुचाकी आणि सात मोबाईल असा एकूण ६४ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुसद पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध दारू विक्रीच्या धंद्यात मोठी खळबळ उडाली आहे. पुढील तपास पुसद शहर पोलीस करत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button