माहूर गडावर संरक्षक भिंत कोसळली; गडकरींच्या स्काय वॉक प्रकल्पात कंत्राटदाराची हलगर्जी, भाविकांचा संताप
माहूर : माहूर गडावरील श्री रेणुका देवी संस्थान परिसरात मोठी दुर्घटना टळली असली तरी कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे संस्थानाच्या संरक्षक भिंतीचा सुमारे २५ मीटर भाग कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत अनेक खोल्यांमध्ये ठेवलेली भाविकांची पूजासामग्री, समया, ओटीचे पातळ, व इतर मौल्यवान साहित्य पूर्णपणे मातीमध्ये मिसळून खराब झालं.
लिफ्ट आणि स्काय वॉकसाठी गडकरींनी दिला होता ५० कोटींपेक्षा अधिक निधी
श्री रेणुका देवी मंदिरावर जाण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लिफ्ट आणि स्काय वॉकच्या सुविधांसाठी मोठा निधी मंजूर केला होता. मात्र, कंत्राटदार गुरुबक्षांनी यांनी या कामात गंभीर दुर्लक्ष करत मुख्य मंदिराच्या पश्चिम बाजूचा भाग खोलून संरक्षक भिंत वेळेत उभी केली नाही. परिणामी पावसामुळे या भागातील माती वाहून गेली आणि भिंत कोसळली.
मुख्य मंदिरालाही धोका; प्रशासनाच्या निष्क्रियतेवर भाविकांचा संताप
ही भिंत मुख्य मंदिरापासून काही मीटर अंतरावर असल्याने, या कोसळलेल्या भिंतीमुळे मंदिरालाही धोका निर्माण झाला आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेता भाविकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
अनेक वेळा स्थानिक माध्यमांद्वारे या घटकांवर आधीच इशारे देण्यात आले होते. मात्र संस्थानचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी, न्यायालयीन विश्वस्त, तहसीलदार आणि पोलिस अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात येत आहे.
भाविकांमध्ये तीव्र संताप, कंत्राटदारावर कठोर कारवाईची मागणी
या घटनेनंतर लाखो भाविकांमध्ये संतापाचे वातावरण असून संबंधित कंत्राटदार गुरुबक्षांनी यांच्यासह दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी याआधी काम तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. मात्र प्रत्यक्षात सुरक्षा उपाययोजना न केल्यामुळे ही घटना घडली.



