समृद्धी महामार्गावर दगडफेकीचे सत्र! वनोजाजवळ ८ ते १० वाहनांना लक्ष्य; अज्ञात दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान

ट्रक, कार आणि बसच्या काचा फुटल्या; वाहनांचे मोठे नुकसान, काही काळ वाहतूक ठप्प; वाहनधारकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
वाशिम : वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर वाहनधारकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शेलूबाजारनजीक वनोजा गावाच्या परिसरात रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी धावत्या वाहनांवर दगडफेक केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत तब्बल ८ ते १० वाहनांना लक्ष्य करण्यात आले असून, वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या दगडफेकीमुळे महामार्गावर काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, वनोजा परिसरातून समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. यामध्ये एका ट्रकसह कार आणि बसच्या काचा फुटल्या. धावत्या वाहनांवर अचानक दगड आदळल्याने वाहनचालकांमध्ये घबराट पसरली. या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच मंगरूळपीर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात आणत पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत केली.

या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून, दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. मात्र, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत धावत्या वाहनांना लक्ष्य करणारे हे अज्ञात व्यक्ती नेमके कोण आहेत? त्यांनी वाहनांवर दगडफेक का केली? या घटनेमागे नेमका काय उद्देश होता? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
विशेष म्हणजे, समृद्धी महामार्गावरून दररोज मोठ्या संख्येने वाहने धावत असतात. अशा परिस्थितीत धावत्या वाहनांवर दगडफेक होणे ही गंभीर बाब असून, यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे या घटनेतील आरोपींचा तातडीने शोध घेऊन महामार्गावरील वाहनधारकांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
या घटनेबाबत मंगरूळपीरचे पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल क्षीरसागर यांनी माहिती दिली. आता पोलीस तपासातून दगडफेकीमागील नेमके कारण आणि आरोपींची ओळख कधी समोर येते, याकडे वाहनधारकांचे लक्ष लागले आहे.



