अधिकारी गैरहजर; प्रहारचा अनोखा निषेध! भूमी अभिलेख उपअधीक्षकांच्या खुर्चीला हार घालून शेतकऱ्यांचे आंदोलन

शेतकऱ्यांच्या रस्त्याच्या प्रश्नावर निवेदन देण्यासाठी गेलेल्या आंदोलकांना अधिकारीच भेटले नाहीत; प्रकाश वानखडे यांच्या खुर्चीला हार घालून निषेध, कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
चांदूर रेल्वे : शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याची जबाबदारी असलेल्या शासकीय कार्यालयातच अधिकारी उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा प्रकार चांदूर रेल्वे येथे समोर आला आहे. शेतकऱ्यांच्या शेतरस्त्याच्या प्रश्नासंदर्भात निवेदन देण्यासाठी गेलेल्या प्रहार सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांना भूमी अभिलेख कार्यालयात जबाबदार अधिकारीच उपस्थित नसल्याचे आढळले. याचा निषेध नोंदवण्यासाठी संतप्त कार्यकर्त्यांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख प्रकाश वानखडे यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.

२७ नोव्हेंबर रोजी प्रहार सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकरी चांदूर रेल्वे येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात शेतकऱ्यांच्या रस्त्याच्या प्रश्नावर निवेदन देण्यासाठी पोहोचले होते. मात्र, यावेळी कार्यालयात कोणताही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांना आपली समस्या मांडता आली नाही. शेतकरी शेतीची कामे बाजूला ठेवून दूरवरून शासकीय कार्यालयात येतात; मात्र अधिकारीच भेटत नसतील, तर न्याय कोणाकडे मागायचा, असा संतप्त सवाल आंदोलकांनी उपस्थित केला.
कार्यालयातील या प्रकाराचा निषेध म्हणून प्रहार सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपअधीक्षक प्रकाश वानखडे यांच्या खुर्चीला हार घातला आणि त्याच खुर्चीसमोर आपले निवेदन सादर केले. शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांची कामे रखडत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
सध्या शेतकरी विविध संकटांचा सामना करत असताना त्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी असलेल्या कार्यालयातच अधिकारी उपलब्ध होत नसतील, तर शेतकऱ्यांनी दाद मागायची कुठे, असा प्रश्न प्रहारच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. संबंधित दिवशी कार्यालयात अनुपस्थित असलेल्या जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर तातडीने योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
तसेच, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही, तर प्रहार सामाजिक संघटना आपल्या आक्रमक शैलीत आंदोलन छेडेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.



