बडनेऱ्यात पोलिसांची विशेष नाकाबंदी; चांदणी चौक अन् यवतमाळ टी पॉइंटवर वाहनांची कसून तपासणी!

पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशाने मोहीम; वाहनांची कागदपत्रे, ड्रायव्हिंग लायसन्सची पडताळणी, संशयास्पद हालचालींवरही पोलिसांची नजर
बडनेरा (मच्छिंद्र भटकर) :
अमरावती शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबतच गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी बडनेरा परिसरात पोलिसांकडून विशेष नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबविण्यात आली असून, बडनेरा येथील चांदणी चौक आणि यवतमाळ टी पॉइंट या प्रमुख ठिकाणी वाहनांची कसून तपासणी करण्यात आली.

या मोहिमेदरम्यान पोलिसांनी रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या दुचाकी, चारचाकी आणि इतर वाहनांना थांबवून त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली. वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र, वाहन चालविण्याचा परवाना तसेच इतर आवश्यक कागदपत्रे तपासण्यात आली. वाहनचालकांकडे वैध परवाना आहे का, वाहनांची कागदपत्रे अद्ययावत आहेत का आणि वाहतूक नियमांचे पालन केले जात आहे का, याची पोलिसांनी खातरजमा केली.
गुन्हेगारी प्रवृत्तींवरही पोलिसांची नजर!
बडनेरा परिसरात रेल्वे स्थानक, बाजारपेठ आणि प्रमुख मार्ग असल्याने वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या पार्श्वभूमीवर नाकाबंदीच्या माध्यमातून केवळ वाहतूक नियमांची तपासणी न करता संशयास्पद व्यक्ती आणि वाहनांच्या हालचालींवरही लक्ष केंद्रित करण्यात आले. संभाव्य गुन्हेगारी घटनांना प्रतिबंध घालणे, संशयित हालचालींची माहिती मिळविणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनित कुलट यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
बडनेरा येथील ही विशेष नाकाबंदी मोहीम वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनित कुलट यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत हेड कॉन्स्टेबल एजाज शहा, पोलीस कॉन्स्टेबल सुधीर परांजपे, प्रमोद सायरे, रितेश चव्हाण तसेच वाहतूक शाखेचे सतीश चौधरी यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, वाहनचालकांनी वाहन चालविताना आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत, वैध ड्रायव्हिंग लायसन्स बाळगावे, दुचाकी चालविताना हेल्मेटचा आणि चारचाकी वाहनात सीट बेल्टचा वापर करावा. तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.



