अमरावतीत विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या राष्ट्रव्यापी हितचिंतक अभियानाचा शुभारंभ

प.पू. जितेंद्रनाथ महाराज यांच्या हस्ते पहिली देणगी पावती; १५ दिवस चालणार अभियान, प्रत्येक हितचिंतकाकडून २० रुपये सहयोग निधी स्वीकारणार
अमरावती : विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल अमरावती महानगराच्या वतीने राष्ट्रव्यापी हितचिंतक अभियानाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. प.पू. श्री जितेंद्रनाथ महाराज यांच्या शुभहस्ते पहिली हितचिंतक देणगी पावती काढून या अभियानाची विधिवत सुरुवात करण्यात आली. हिंदू समाजाचे संघटन, धर्मजागरण, भारतीय संस्कृती आणि परंपरांचे संरक्षण तसेच सामाजिक समरसतेचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हे अभियान सलग १५ दिवस राबविण्यात येणार आहे.
या अभियानाच्या शुभारंभप्रसंगी प.पू. श्री जितेंद्रनाथ महाराज यांनी हिंदू समाजातील सर्व बंधू-भगिनींनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. धर्म, संस्कृती, परंपरा आणि संस्कारांचे जतन करण्यासाठी समाजाने संघटित होणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या परीने या कार्यात योगदान देऊन संघटनात्मक कार्याला बळ द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, या अभियानाची उद्दिष्टे, कार्यपद्धती आणि व्यापक स्वरूप जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विश्व हिंदू परिषद अमरावतीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी अभियानामागील भूमिका स्पष्ट केली. सन १९६४ मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वावर विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाली. हिंदू समाजाचे संघटन, धर्म आणि संस्कृतीचे संरक्षण व संवर्धन, सामाजिक एकात्मता आणि समरसता निर्माण करणे ही परिषदेच्या कार्याची प्रमुख उद्दिष्टे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
हे हितचिंतक अभियान केवळ सदस्यत्व नोंदणीपुरते मर्यादित नसून समाजातील प्रत्येक व्यक्ती आणि कुटुंबाला विश्व हिंदू परिषदेच्या कार्याशी जोडणारा व्यापक जनसंपर्क उपक्रम असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. सेवा, संस्कार, धर्मजागरण आणि सामाजिक समरसतेच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्याचा या अभियानातून प्रयत्न केला जाणार आहे.
या अभियानांतर्गत प्रत्येक हितचिंतकाकडून केवळ २० रुपये सहयोग निधी स्वीकारण्यात येणार आहे. सलग १५ दिवस चालणाऱ्या या उपक्रमात युवक, महिला, व्यावसायिक तसेच समाजातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या नागरिकांना सहभागी करून घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.



