नेरला येथील मतिमंद मुलींच्या वसतिगृहात संतापजनक प्रकार; अल्पवयीन मुलाकडून अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तनाचा आरोप!

पॉक्सो कायद्यांतर्गत अड्याळ पोलिसांत गुन्हा दाखल; आरोपी बाल न्याय मंडळाच्या निरीक्षण गृहात, वसतिगृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
भंडारा (प्रतिनिधी सुधीर शिवणकर) : भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील नेरला येथील मतिमंद मुलींच्या वसतिगृहात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसतिगृहात प्रवेश करून एका अल्पवयीन मुलाने तेथील अल्पवयीन मतिमंद मुलीशी अश्लील वर्तन केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत अड्याळ पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. संबंधित अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी नागपूर येथील बाल न्याय मंडळाच्या निरीक्षण गृहात पाठविण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अड्याळ पोलीस करीत आहेत.
मात्र, या घटनेने केवळ आरोपीच्या वर्तनाचाच नव्हे, तर वसतिगृहाच्या सुरक्षा व्यवस्थेचाही प्रश्न उपस्थित केला आहे. मतिमंद आणि अल्पवयीन मुलींच्या निवासाची व सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या वसतिगृहात बाहेरील व्यक्तीचा प्रवेश झाला कसा, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकांची नियुक्ती होती का? सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत होती का? तसेच मुलींच्या देखरेखीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांकडून नियमित देखरेख केली जात होती का? असे अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहेत.
वसतिगृह प्रशासनाच्या भूमिकेची चौकशी होणार का?
या प्रकरणात केवळ गुन्हा दाखल करून थांबणे पुरेसे ठरणार नाही. वसतिगृहातील सुरक्षा व्यवस्थेची सखोल तपासणी होणे आवश्यक आहे. त्यासाठी सीसीटीव्ही फुटेज, प्रवेश नोंदवही, कर्मचारी उपस्थिती आणि सुरक्षा व्यवस्थेची पडताळणी करण्यात यावी. तसेच कर्तव्यात कसूर किंवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी होत आहे.
विशेष म्हणजे, विशेष काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या मुलींच्या निवासस्थानीच असा प्रकार घडल्याने पालक आणि नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. मुलींच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने कोणती खबरदारी घेतली होती आणि या घटनेला कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीची जबाबदारी कोणाची, याची उत्तरे मिळणे गरजेचे आहे.
नेरला येथील या घटनेची निष्पक्ष चौकशी करून वसतिगृहातील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर कराव्यात आणि मुलींच्या संरक्षणासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
सिटी न्यूजसाठी सुधीर शिवणकर, भंडारा.



