कांद्री नाक्यावर ट्रकचालकांचा राडा; पोलिसांचा लाठीमार!

वजनकाट्यावरून सुरू झालेला वाद चिघळला; शेकडो चालकांचे रास्ता रोको, तीन तास महामार्ग ठप्प; तिघांना अटक
रामटेक | प्रतिनिधी अजय मेहरकुळे
नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील रामटेक तालुक्यातील कांद्री सीमा तपासणी नाक्यावर सोमवारी ट्रकचालकांनी जोरदार गोंधळ घातल्याची घटना घडली. वजनकाट्यावर ट्रकचे वजन न करता पुढे जाण्याच्या प्रयत्नातून सुरू झालेला वाद काही वेळातच चिघळला. चौकीदाराने मारहाण केल्याचा आरोप करीत शेकडो ट्रकचालक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक तब्बल तीन तास ठप्प झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अखेर लाठीमार करावा लागला. या प्रकरणी तीन ट्रकचालकांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कांद्री येथील राज्य सीमा तपासणी नाक्यालगत एका खासगी कंपनीचा वजनकाटा कार्यरत आहे. या ठिकाणी मालवाहू वाहनांचे वजन करून त्याची पावती आरटीओ तपासणी नाक्यावर सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतरच वाहनांना पुढील प्रवासाची परवानगी दिली जाते. सोमवारी दुपारी सुमारे चार वाजताच्या सुमारास नूर मोहम्मद इशा मोहम्मद या ट्रकचालकाने वजनकाट्यावर ट्रक न नेता थेट पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी तेथील चौकीदाराने ट्रक अडवून बॅरिकेड्स लावले. मात्र, चौकीदाराने आपल्याला दगड मारल्याचा आरोप संबंधित ट्रकचालकाने केला.

या घटनेची माहिती इतर ट्रकचालकांना मिळताच त्यांनीही घटनास्थळी गर्दी केली. चौकीदाराने संबंधित चालकाची माफी मागावी, अशी मागणी करीत ट्रकचालकांनी महामार्गावर वाहने उभी करून रास्ता रोको सुरू केला. पाहता पाहता आंदोलनात शेकडो चालक सहभागी झाले. त्यामुळे नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. मालवाहू वाहनांसह खासगी वाहने आणि प्रवासी वाहतुकीलाही मोठा फटका बसला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रामटेकचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, रामटेक पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजेशकुमार थोरात, देवलापारचे ठाणेदार नारायण तुरकुंडे, पारशिवनीचे ठाणेदार किशोर शेरकी यांच्यासह विविध पोलीस पथके आणि महामार्ग पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आंदोलक ट्रकचालकांची समजूत काढण्याचा आणि महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वारंवार आवाहन करूनही चालक रस्ता मोकळा करण्यास तयार नव्हते.
अखेर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. त्यानंतर आंदोलकांना पांगवून महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली. या प्रकरणी नूर मोहम्मद इशा मोहम्मद, शकील आश मोहम्मद खान आणि शहाबुद्दीन हिना खान या तीन ट्रकचालकांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे कांद्री सीमा तपासणी नाक्यावरील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते.
रुग्णवाहिका आणि प्रवासी बसही वाहतूक कोंडीत अडकल्या!
ट्रकचालकांच्या रास्ता रोको आंदोलनाचा फटका केवळ मालवाहू वाहनांनाच बसला नाही, तर रुग्णवाहिका, प्रवासी बस आणि अन्य खासगी वाहनांनाही त्याचा सामना करावा लागला. महामार्गावर वाहतुकीच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. रुग्णवाहिका अडकून पडल्याने रुग्णांच्या सेवेतही अडथळा निर्माण होण्याची शक्यता होती. सर्वसामान्य प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि आपत्कालीन वाहनांना मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी पोलिसांना कठोर भूमिका घ्यावी लागल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी स्पष्ट केले.
वजनकाट्याच्या व्यवस्थापनावर ट्रकचालकांचे प्रश्नचिन्ह!
दरम्यान, कांद्री येथील खासगी कंपनीच्या वजनकाट्याच्या कामकाजाबाबत ट्रकचालकांनी गंभीर तक्रारी केल्या आहेत. वजनकाटा वारंवार बंद पडतो, तसेच वाहनांच्या रांगेचे योग्य नियोजन केले जात नाही. चौकीदारांकडूनही वाहनचालकांशी योग्य पद्धतीने व्यवहार केला जात नसल्याचा आरोप आंदोलकांनी माध्यमांशी बोलताना केला. या अव्यवस्थेमुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असून ट्रकचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
वजनकाट्याची व्यवस्था सुधारणार कधी?
कांद्री सीमा तपासणी नाक्यावरील या घटनेमुळे खासगी वजनकाट्याच्या व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वजनकाट्याची कार्यक्षमता, वाहनांच्या रांगेचे नियोजन आणि चौकीदारांकडून होणारा व्यवहार याबाबत संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. दुसरीकडे, आपल्या मागण्यांसाठी राष्ट्रीय महामार्ग रोखून रुग्णवाहिका आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरण्याच्या प्रकारावर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामुळे कांद्री नाक्यावरील वजनकाट्याची व्यवस्था सुधारण्यासाठी प्रशासन कोणती पावले उचलणार आणि भविष्यात अशा प्रकारच्या वाहतूक कोंडीला आळा कसा घालणार, याकडे आता वाहनचालकांसह प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
सिटी न्यूज | प्रतिनिधी – अजय मेहरकुळे, रामटेक



