मध्य प्रदेशातून अफूची तस्करी; नागपूर ग्रामीण पोलिसांची ३० लाखांची मालमत्ता जप्त

बेला ते भिवापूरपर्यंत पाठलाग करून दोघांना पकडले; मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि तेलंगणा कनेक्शन उघड
नागपूर ग्रामीण : अफू तस्करीविरोधात नागपूर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. मध्य प्रदेशातून दोन वाहनांमधून अफूची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बेला ते भिवापूरपर्यंत पाठलाग करून दोन्ही आरोपींना पकडले. त्यांच्याकडून दोन किलोहून अधिक अफू, फोर्ड इकोस्पोर्ट कार आणि बोलेरो पिकअप वाहन असा एकूण सुमारे ३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातून आणलेला अफू महाराष्ट्रासह तेलंगणा आणि इतर भागांत पुरवला जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे या तस्करीचे आंतरराज्यीय कनेक्शन उघड झाले असून, या रॅकेटमध्ये आणखी किती जण सहभागी आहेत, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
मुख्य पुरवठादार आणि खरेदीदारांचा शोध सुरू
या तस्करीमागील मुख्य पुरवठादार कोण आहे, तसेच अफूची खरेदी कोणाकडून केली जात होती, याचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाच्या आधारे तस्करीच्या संपूर्ण साखळीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या रॅकेटची पाळेमुळे शोधून तस्करीत सहभागी असलेल्या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा नागपूर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिला आहे. या कारवाईमुळे अमली पदार्थांच्या आंतरराज्यीय तस्करीविरोधात नागपूर ग्रामीण पोलिसांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.



