पत्रकारितेच्या नावाखाली महिला सरपंचांकडे खंडणीची मागणी!

नागपूर ग्रामीण पोलिसांची भोपाळमध्ये मोठी कारवाई; चार महिला आरोपी अटकेत, ५४ मोबाईलसह ७.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त; देशभरातील सरपंचांना लक्ष्य करणारे कॉल सेंटरचे जाळे उघड
नागपूर | प्रतिनिधी विशाल बांबटवार
पत्रकारितेच्या नावाचा गैरवापर करून महिला सरपंचांना फोनद्वारे धमकावणे आणि बदनामीकारक बातम्या प्रसिद्ध करण्याची भीती दाखवून पैशांची मागणी करणाऱ्या टोळीचा नागपूर ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ‘दैनिक श्रेष्ठ न्यूज’च्या नावाखाली हा कथित खंडणीचा प्रकार सुरू होता. या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी मध्य प्रदेशातील भोपाळ येथून चार महिला आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे, या टोळीकडून ५४ मोबाईल फोन, लॅपटॉप, संगणक, प्रिंटर आणि इतर साहित्य असा एकूण ७ लाख २९ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. देशातील विविध राज्यांतील सरपंच आणि ग्रामसेवकांची माहिती गोळा करून त्यांना फोन करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कॉल सेंटर चालविले जात असल्याचे तपासात उघड झाले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महिला सरपंचांची तक्रार
दिनांक ८ नोव्हेंबर २०२६ रोजी लोहारी सावंगा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान काही महिला सरपंचांनी ‘श्रेष्ठ न्यूज’च्या नावाने फोन करून पैशांची मागणी केली जात असल्याची तक्रार केली होती. पैसे न दिल्यास बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करण्याची धमकी दिली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

या तक्रारीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार यांना तातडीने गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित महिला सरपंचांशी संपर्क साधून त्यांच्या तक्रारींची सविस्तर माहिती घेतली.

नरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणातील तक्रारदार मीना सुरेशसिंग सूर्यवंशी (वय ४७, रा. मोवाड, ता. नरखेड, जि. नागपूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २१ ऑगस्ट ते ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत एका अनोळखी महिलेने स्वतःला दैनिक श्रेष्ठ न्यूजची प्रतिनिधी असल्याचे सांगून विविध सरपंचांशी संपर्क साधला होता.

जुनोना येथील सरपंच प्रभा ओमप्रकाश गोतमारे, देवळी येथील माजी सरपंच मंगला कोरडे, भिष्णूर येथील सरपंच लता बानगडे, मायवाडी येथील सरपंच गौतम शेंडे, तसेच खुरशी येथील सरपंच यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता. याशिवाय तक्रारदार महिला सरपंचांनाही लक्ष्य करण्यात आले.
१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा जाहिरात प्रसिद्ध करण्याच्या नावाखाली तक्रारदारांकडे ३ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. त्यासाठी ऑनलाइन पेमेंट करण्याकरिता क्यूआर कोड पाठविण्यात आला होता. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर बदनामीकारक बातम्या प्रसिद्ध करण्याची धमकी देण्यात आली. तसेच जुनोना येथील सरपंच प्रभा गोतमारे यांच्या दिशाभूल करून ६ सप्टेंबर २०२६ रोजी ऑनलाइन पद्धतीने ५०० रुपये स्वीकारण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या तक्रारीवरून नरखेड पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ९१६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८(३), ३१८(२), ३१९(२) आणि ३५२(६) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
भोपाळमध्ये तीन ठिकाणी कॉल सेंटरचे जाळे
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हात्रे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी काटोल पराग पोते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि नरखेड पोलीस ठाण्याचे स्वतंत्र पथक तयार करण्यात आले.
सायबर पोलिसांकडून प्राप्त तांत्रिक पुराव्यांचे सखोल विश्लेषण करण्यात आले. त्यातून या टोळीचे धागेदोरे मध्य प्रदेशातील भोपाळपर्यंत पोहोचले. पोलिसांनी भोपाळ येथे तपास करून तीन ठिकाणी कॉल सेंटर सुरू असल्याचे उघड केले.
हबीबगंज नगर परिसरात दोन, निशातपुरा परिसरात चार, तर एमपी-२ नगर परिसरात चार मुली काम करीत असल्याचे तपासात समोर आले. या तीन कॉल सेंटरमध्ये एकूण ३५ मुलींना वेतनावर कामासाठी नियुक्त करण्यात आले होते. या मुलींकडून सरपंच आणि ग्रामसेवकांना फोन करून संपर्क साधण्याचे काम करून घेतले जात होते.
सात राज्यांतील सरपंचांची माहिती गोळा!
या कॉल सेंटरमध्ये मराठी, हिंदीसह विविध भाषांचे ज्ञान असलेल्या मुलींची नियुक्ती करण्यात आली होती. संबंधित मुली ज्या भाषेत संवाद साधू शकतात, त्या भाषिक राज्यांतील सरपंच आणि ग्रामसेवकांना लक्ष्य केले जात होते. प्रत्येक राज्यासाठी चार मुली नेमण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
महापंचायत पोर्टलचा वापर करून महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यांतील सरपंच व ग्रामसेवकांचे मोबाईल क्रमांक गोळा करण्यात आले होते. अशा प्रकारे एकूण ६२८ नोंदींचे रजिस्टर तयार करण्यात आले होते. या माहितीच्या आधारे संबंधित सरपंचांना फोन करून दैनिक श्रेष्ठ न्यूजच्या नावाखाली जाहिरातीसाठी पैशांची मागणी केली जात होती.
पैसे देण्यास नकार देणाऱ्या सरपंचांच्या विरोधात ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहार प्रसिद्ध करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रकार सुरू असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
चार महिला आरोपींना अटक
नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भोपाळ येथे कारवाई करून खालील चार महिला आरोपींना अटक केली.
१. मोनिका लालसिंग सूर्यवंशी (वय २८) – रा. बागची, नरसिंहगड, जि. राजगड, मध्य प्रदेश (मुख्य आरोपी).
२. नेहा लालसिंग सूर्यवंशी (वय २३) – रा. बागची, नरसिंहगड, जि. राजगड, मध्य प्रदेश.
३. अक्षरा मिलिंद अर्क (वय २२) – रा. भोपाळ, मध्य प्रदेश.
४. कोमल मोहन मोरे (वय २३) – रा. अन्ना नगर, गोविंदपुरा, भोपाळ, मध्य प्रदेश.
या चारही महिला आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून या कथित खंडणी प्रकरणासंदर्भात पुढील तपास सुरू आहे.
७ लाख २९ हजारांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी आरोपींकडून मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत. यामध्ये ५४ मोबाईल फोन, दोन लॅपटॉप, दोन संगणक, दोन प्रिंटर, सरपंच व ग्रामसेवकांचे मोबाईल क्रमांक असलेले रजिस्टर, दैनिक श्रेष्ठ न्यूजचे प्रिंट केलेले पॉकेट व पर्चे, बँकेचे स्कॅनर, रिसीट रोल आणि चेकबुक यांचा समावेश आहे.
या सर्व जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ७ लाख २९ हजार २६० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
नियोजनबद्ध पद्धतीने सुरू होता कथित खंडणीचा प्रकार
तपासादरम्यान आरोपी महिलांनी तयार केलेल्या रजिस्टरमधील मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधून दैनिक श्रेष्ठ न्यूजच्या नावाखाली जाहिरातीसाठी पैशांची मागणी केली जात असल्याचे उघड झाले. ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहार उघड करण्याची धमकी देऊन पैसे उकळण्याचा हा प्रकार पूर्वनियोजित आणि संघटित पद्धतीने सुरू असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, या टोळीने देशातील इतर किती सरपंचांना लक्ष्य केले आणि या कथित वसुलीत आणखी कोणाचा हात आहे, याचा पुढील तपास नागपूर ग्रामीण पोलीस करीत आहेत.
पत्रकारितेच्या विश्वासार्हतेचा गैरवापर करून लोकप्रतिनिधींना धमकावणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश झाल्याने ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
सिटी न्यूज | प्रतिनिधी विशाल बांबटवार, नागपूर



