AmravatiAmravati Gramincitynewslatestnewss breakingnews

जिल्ह्यात १३ आमदार, दोन खासदार; तरीही शकुंतला रेल्वे बंदच!

१२० वर्षांचा ऐतिहासिक वारसा असलेली अचलपूर-मूर्तिजापूर-यवतमाळ रेल्वे प्रतीक्षेत; ब्रॉडगेज प्रकल्पाचा डीपीआर रेल्वे बोर्डाकडे, मंजुरी कधी मिळणार?

अमरावती | पत्रकार निखिल ठाकरानी

पश्चिम विदर्भाच्या औद्योगिक, सामाजिक आणि आर्थिक विकासाची जीवनवाहिनी ठरू शकणारी अचलपूर-मूर्तिजापूर-दारव्हा (यवतमाळ) ही ऐतिहासिक शकुंतला रेल्वे आजही बंद अवस्थेत आहे. विशेष म्हणजे, अमरावती जिल्ह्यात १३ आमदार आणि दोन खासदार असतानाही या रेल्वेच्या पुनरुज्जीवनाचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. त्यामुळे विदर्भातील लाखो नागरिकांच्या मनात एकच प्रश्न उपस्थित होत आहे की, लोकप्रतिनिधींची मोठी संख्या असतानाही शकुंतला रेल्वेला ब्रॉडगेजचे भाग्य कधी लाभणार? दरम्यान, या ऐतिहासिक रेल्वेमार्गाच्या ब्रॉडगेज रूपांतरासाठी तयार करण्यात आलेला सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) अखेर रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला असून, त्याच्या तांत्रिक तपासणीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून मिळाली आहे.

ब्रिटिशकालीन मालकीमुळे प्रकल्प रखडला

शकुंतला रेल्वे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मार्गाला सुमारे १२० वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. ब्रिटिश काळातील सेंट्रल प्रोव्हिन्स रेल्वे कंपनीच्या मालकीशी संबंधित असलेल्या या रेल्वेमार्गाच्या हस्तांतरण, रॉयल्टी आणि तांत्रिक स्वामित्वाच्या गुंतागुंतीमुळे ब्रॉडगेज प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला होता. अचलपूर, मूर्तिजापूर आणि यवतमाळ या भागांना जोडणारा हा रेल्वेमार्ग ग्रामीण भागातील नागरिकांसाठी प्रवासाचे महत्त्वाचे साधन होता. मात्र, रेल्वेसेवा बंद झाल्याने अमरावती, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यांतील अनेक गावांचा रेल्वे संपर्क विस्कळीत झाला. परिणामी, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, नोकरदार आणि सर्वसामान्य प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

महाराष्ट्र सरकारचा ५० टक्के आर्थिक सहभाग

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती देण्यासाठी २०१७ मध्ये महाराष्ट्र सरकारने भांडवली गुंतवणूक कार्यक्रमांतर्गत प्रकल्पाच्या खर्चातील ५० टक्के आर्थिक वाटा उचलण्यास तत्त्वतः सहमती दर्शविली होती. त्यानंतर फेब्रुवारी २०२४ च्या राज्याच्या अर्थसंकल्पात महायुती सरकारने या आर्थिक सहभागासाठी आवश्यक तरतूद केली. त्यामुळे प्रकल्पाच्या निधीचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र, आर्थिक तरतुदीनंतरही प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची प्रतीक्षा कायम आहे.

ब्रॉडगेज प्रकल्पाचे दोन टप्प्यांत नियोजन

रेल्वे प्रशासनाकडून या संपूर्ण प्रकल्पाचे नियोजन दोन प्रमुख भागांत करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात यवतमाळ ते मूर्तिजापूर आणि दुसऱ्या टप्प्यात मूर्तिजापूर ते अचलपूर या मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर प्रस्तावित आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला असून, त्याची तांत्रिक तपासणी आणि प्रशासकीय समीक्षा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. आता रेल्वे बोर्डाकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतरच प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे.

१८९ किलोमीटरचा रेल्वेमार्ग; विदर्भाच्या विकासाला नवी दिशा!

अचलपूर-मूर्तिजापूर-यवतमाळ हा सुमारे १८९ किलोमीटरचा ऐतिहासिक रेल्वेमार्ग ब्रॉडगेज झाल्यास पश्चिम विदर्भाच्या विकासाला मोठी चालना मिळू शकते. रेल्वेसेवा सुरू झाल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना स्वस्त आणि सुलभ वाहतूक उपलब्ध होईल. शेतमालाची वाहतूक, औद्योगिक गुंतवणूक, व्यापार, रोजगार आणि पर्यटन क्षेत्रालाही याचा फायदा होऊ शकतो. विशेषतः अचलपूर, दर्यापूर, मूर्तिजापूर आणि यवतमाळ परिसरातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला या प्रकल्पामुळे नवी उभारी मिळण्याची अपेक्षा आहे.

१३ आमदार, दोन खासदार; मग शकुंतलेचा प्रश्न मार्गी का लागत नाही?

एकीकडे पश्चिम विदर्भाच्या विकासासाठी शकुंतला रेल्वे ब्रॉडगेज होणे अत्यंत आवश्यक असल्याचे सातत्याने सांगितले जाते, तर दुसरीकडे प्रत्यक्ष रेल्वेसेवा बंदच आहे. जिल्ह्यात १३ आमदार आणि दोन खासदार असतानाही या महत्त्वाच्या प्रश्नावर ठोस निर्णयाची प्रतीक्षा कायम आहे. लोकप्रतिनिधींनी केंद्र आणि राज्य सरकारकडे एकत्रितपणे पाठपुरावा करून या प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळवून देण्याची गरज आहे. केवळ आश्वासने आणि घोषणांवर समाधान न मानता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणे हीच आता नागरिकांची अपेक्षा आहे.

शकुंतला रेल्वे हा केवळ प्रवासाचा मार्ग नसून पश्चिम विदर्भाच्या विकासाशी जोडलेला महत्त्वाचा प्रश्न आहे. १२० वर्षांचा इतिहास असलेल्या या रेल्वेला पुन्हा धावण्याची संधी मिळणार का, रेल्वे बोर्डाची मंजुरी कधी मिळणार आणि विदर्भाचा विकास मागासलेपणाच्या गर्तेतून बाहेर कधी पडणार, याकडे आता संपूर्ण पश्चिम विदर्भाचे लक्ष लागले आहे.

पत्रकार – निखिल ठाकरानी
सिटी न्यूज

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button