प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणातून २१ वर्षीय युवकाची हत्या; दोघांविरुद्ध गुन्हा

चिखली तालुक्यातील टाकरखेड हेलगा येथील घटना; चाकूने वार करून तरुणाचा खून, अमडापूर पोलिसांकडून तपास सुरू
बुलढाणा | प्रतिनिधी
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील टाकरखेड हेलगा येथे प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादातून २१ वर्षीय युवकाची चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना १५ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. गोपाल ऊर्फ संजय मंजुळ पवार असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, घटनेनंतर पोलिसांनी काही तासांतच दोन आरोपींना अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोपाल पवार याचे मागील वर्षभरापासून वर्दडा येथील कोमल भोसले हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. १५ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास गोपाल आणि कोमल हे मोटारसायकलने टाकरखेड हेलगा येथून पांढरदेवकडे निघाले होते. कोमलच्या बहिणीला कपडे देण्यासाठी ते जात असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, दुपारी सुमारे दीड वाजता कोमलने गोपालच्या चुलत भावाला फोन करून अजय ऊर्फ गोट्या विजय पवार आणि कोमल पवार यांनी मिळून गोपालवर चाकूने वार करून त्याची हत्या केल्याचे सांगितले. तसेच कवळा ते महीमळ जाणाऱ्या गाडी रस्त्यावर गोपालचा मृतदेह पडल्याची माहिती दिली.
रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह
माहिती मिळताच गोपालचा भाऊ ओम पवार, चुलत भाऊ करण पवार आणि मनोज पवार घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी गोपाल रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेला होता. त्याच्या उजव्या छातीवर, मानेखाली तसेच उजव्या हाताच्या खांद्याजवळ चाकूने वार केल्याच्या जखमा दिसून आल्या. घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
प्रेमसंबंधातून हत्या झाल्याचा आरोप
गोपाल आणि कोमल यांच्यातील प्रेमसंबंधात अजय ऊर्फ गोट्या याच्याशी असलेले संबंध अडथळा ठरत असल्याने दोघांनी संगनमत करून गोपालची हत्या केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या तक्रारीच्या आधारे अमडापूर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक बालाजी सानप आणि त्यांचे पथक या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. हत्येमागील नेमके कारण आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे.



