काझीरंगाजवळ भीषण अपघात! भरधाव ट्रॅव्हलर कंटेनरवर आदळली; २६ जणांचा मृत्यू

डॅशकॅम व्हिडिओत अपघाताचा थरार कैद; मृतांमध्ये बहुतांश विद्यार्थी, अपघातग्रस्त वाहनावर यापूर्वीही १० हून अधिक वाहतूक नियमभंगाचे दंड
आसाम | प्रतिनिधी
आसाममधील काझीरंगा नॅशनल पार्कजवळ झालेल्या भीषण रस्ते अपघाताचा अंगावर काटा आणणारा डॅशकॅम व्हिडिओ समोर आला आहे. भरधाव वेगाने धावणारी ट्रॅव्हलर मिनीबस महामार्गावरून घसरून थेट विरुद्ध दिशेच्या मार्गावर गेली आणि समोरून येणाऱ्या कंटेनर ट्रकवर जोरदार आदळली. ही धडक इतकी भीषण होती की ट्रॅव्हलरच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला. या भीषण दुर्घटनेत मृतांचा आकडा २६ वर पोहोचला असून मृतांमध्ये बहुतांश विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
आसामच्या गोलाघाट जिल्ह्यात काझीरंगाजवळील रोंगाजन परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७१५ वर हातीकुली चहाच्या मळ्याजवळ हा भीषण अपघात घडला. प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हलर मिनीबस महामार्गावरून जात असताना अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचे डॅशकॅम व्हिडिओमध्ये दिसत आहे. काही क्षणांतच ही मिनीबस विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये गेली आणि समोरून येणाऱ्या कंटेनर ट्रकला जोरदार धडकली. धडकेची तीव्रता एवढी होती की वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. अनेक प्रवासी वाहनाच्या पत्र्यांमध्ये अडकल्याने बचावकार्यही आव्हानात्मक ठरले.
या दुर्घटनेतील सर्वाधिक वेदनादायी बाब म्हणजे मृतांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याचे समोर आले आहे. महाविद्यालयीन तरुण-तरुणींचाही या अपघातात समावेश असल्याची माहिती आहे. हसत्या-खेळत्या तरुणांचे आयुष्य एका क्षणात संपल्याने अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा २६ वर पोहोचल्याने राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, अपघातग्रस्त ट्रॅव्हलरबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाहनाच्या डेटाबेसमधील नोंदीनुसार, या वाहनावर यापूर्वी दहा वेळांहून अधिक वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला होता. त्यापैकी ३८ हजार ५०० रुपयांचा दंड भरलेला होता, तर ४ हजार रुपयांचा दंड अद्याप थकीत असल्याची माहिती आहे. त्यामुळे वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर संबंधित यंत्रणांनी वेळीच कठोर कारवाई केली होती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आसामचे मंत्री अतुल बोरा यांनीही या दुर्घटनेवर प्रतिक्रिया देताना ट्रॅव्हलर अत्यंत वेगाने धावत असल्याचे सांगितले. काझीरंगा मार्गावरील वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्याचा प्राथमिक अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण, चालकाची चूक आणि वाहनाच्या स्थितीबाबत अधिकृत तपासातूनच स्पष्टता येणार आहे.
या दुर्घटनेने पुन्हा एकदा महामार्गावरील अतिवेग, निष्काळजी वाहनचालक आणि वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आणला आहे. एखादे वाहन वारंवार नियमांचे उल्लंघन करत असेल, तर त्यावर केवळ दंड आकारून थांबणे पुरेसे आहे का? अशा वाहनांवर वेळीच कठोर कारवाई झाली असती, तर ही दुर्घटना टाळता आली असती का? असे सवाल आता उपस्थित होत आहेत.
एका भीषण धडकेत २६ जणांचा बळी गेल्याने अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. या दुर्घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली!



