समता नगरमध्ये सहा चाकी ट्रकची जोरदार धडक; ५० वर्षीय अज्ञात व्यक्तीचा जागीच मृत्यू!

राहुल नगर रोडवरील भीषण अपघाताने खळबळ; पोलिसांकडून ट्रक जप्त, मृताची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू
नागपूर : नागपूर शहरातील समता नगर परिसरात भीषण रस्ते अपघाताची घटना समोर आली आहे. राहुल नगर रोडवर सहा चाकी ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत अंदाजे ५० वर्षीय अज्ञात व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अपघातानंतर पोलिसांनी संबंधित ट्रक ताब्यात घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल नगर, समता नगर परिसरातील रस्त्यावर हा अपघात घडला. पोलीस बिट मार्शल कार्तिक सुरेश अंबाडरे यांना पोलीस नियंत्रण कक्षाकडून अपघाताची माहिती मिळाली. माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी पाहणी केली असता, सहा चाकी ट्रक क्रमांक MH 40 CD 4587 याच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ५० वर्षे असून, अद्याप त्यांची ओळख पटलेली नाही. ट्रक चालक आकाश देवराव राऊत याच्याशी संबंधित हे वाहन असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, अपघातानंतर पोलिसांनी संबंधित ट्रक जप्त करून पुढील तपास सुरू केला आहे. मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू असून, अपघात नेमका कशामुळे घडला आणि त्यावेळी नेमकी परिस्थिती काय होती, याचाही तपास केला जात आहे.
समता नगर परिसरातील या अपघातामुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.



