citynews

कुलगाममध्ये सीआरपीएफच्या नाक्यावर दहशतवादी हल्ला; १५ सेकंदांत ३० राऊंड फायरिंग!

मोटरसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांचा जवानांवर अचानक गोळीबार; तीन जवान जखमी, सीसीटीव्ही फुटेज समोर

जम्मू-कश्मीर : जम्मू-कश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सीआरपीएफच्या नाक्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. या हल्ल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून, अवघ्या १५ सेकंदांत सुमारे ३० राऊंड गोळीबार झाल्याचा दावा करण्यात येत आहे. मोटरसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी सीआरपीएफ जवानांवर अचानक गोळीबार केला. जवानांनीही तत्काळ प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात तीन जवान जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास कुलगाम जिल्ह्यातील मीर बाजार परिसरातील अखरानजवळ ही घटना घडली. मोटरसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी सीआरपीएफच्या नाक्याला लक्ष्य करत अचानक गोळीबार सुरू केला. समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही सेकंदांत झालेल्या गोळीबाराची दृश्ये दिसत असल्याचा दावा केला जात आहे.

अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. मात्र, सीआरपीएफ जवानांनी प्रसंगावधान राखत तातडीने मोर्चा सांभाळला आणि हल्लेखोरांना प्रत्युत्तर दिले. या दरम्यान हल्लेखोरांनी गर्दीचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. गोळीबारात जखमी झालेल्या तीन जवानांना अनंतनाग येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

नायब राज्यपालांच्या दौऱ्यादरम्यान हल्ला

विशेष म्हणजे, ज्या वेळी हा हल्ला झाला, त्याच वेळी जम्मू-कश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा हे कुलगाम जिल्ह्याच्या दौऱ्यावर उपस्थित होते. त्यामुळे या घटनेनंतर परिसरातील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही. लष्कर-ए-तैयबाशी संबंधित द रेजिस्टेंस फ्रंट (टीआरएफ)च्या लतीफ भट मॉड्यूलचा या हल्ल्यात सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, या दाव्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी घटनास्थळ आणि आसपासचा परिसर सील करून शोधमोहीम सुरू केली आहे. मोटरसायकलवरून आलेले हल्लेखोर नेमके कोण होते, त्यांचा हल्ल्यामागील उद्देश काय होता आणि त्यांचा कोणत्या दहशतवादी संघटनेशी संबंध आहे का, याचा तपास सुरक्षा यंत्रणांकडून केला जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button