वाशिममध्ये कंत्राटदाराचा अजब कारभार! वीज वाहिनीवर थेट आकडा टाकून रस्त्याचे खोदकाम

महावितरणची परवानगी न घेताच वीज चोरी करून ब्रेकर मशीन चालवल्याचा आरोप; नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
वाशिम : वाशिम शहरात पथदिवे बसविण्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्याचे खोदकाम करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ब्रेकर मशीनला थेट विद्युत वाहिनीवर आकडा टाकून वीजपुरवठा घेतल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे, यासाठी महावितरणची कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याचा आरोप होत आहे.

शहरातील पाटणी चौक ते लाखाळा दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर हे काम सुरू आहे. खोदकामासाठी वापरल्या जाणाऱ्या ब्रेकर मशीनला थेट वीज वाहिनीवरून जोडणी देण्यात आल्याचे चित्र समोर आले आहे. अशा प्रकारे अनधिकृतपणे वीजपुरवठा घेऊन काम सुरू असल्याने वीज चोरीचा प्रकार घडत असल्याचा आरोप केला जात आहे.

नियमानुसार अशा प्रकारच्या कामांसाठी कंत्राटदाराने स्वतःच्या जनरेटरची व्यवस्था करणे अपेक्षित असताना, महावितरणची परवानगी न घेता विद्युत वाहिनीवरून थेट वीज घेतल्याचे दिसत आहे. या प्रकारामुळे कामगारांसह रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या प्रकाराची महावितरण प्रशासन दखल घेणार का? संबंधित कंत्राटदाराकडून वीज चोरी झाल्याचे निष्पन्न झाल्यास त्याच्यावर कोणती कारवाई केली जाणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. शहरातील सार्वजनिक कामे करताना सुरक्षिततेचे नियम आणि विद्युत यंत्रणेची परवानगी पाळली जाते की नाही, हा प्रश्नही या घटनेमुळे उपस्थित झाला आहे.



