citynewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

बंद घरांना लक्ष्य करणारी चोरट्यांची टोळी धंतोली पोलिसांच्या जाळ्यात!

पुण्याला गेलेल्या नागरिकांच्या घरफोडीचा पर्दाफाश; तीन आरोपी अटकेत, ऑटो रिक्षासह दुचाकी चोरीचेही गुन्हे उघड, २ लाख ११ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त

नागपूर : नागपूर शहरातील घरफोडी आणि वाहन चोरीच्या घटनांचा धंतोली पोलिसांनी मोठा छडा लावला आहे. नातेवाइकांकडे पुण्याला गेलेल्या नागरिकांची बंद घरे हेरून चोरी करणाऱ्या तीन आरोपींना धंतोली पोलिसांच्या डीबी पथकाने अटक केली आहे. या कारवाईत दोन घरफोड्यांसह ऑटो रिक्षा चोरी, बजाजनगरमधील पल्सर मोटरसायकल चोरी आणि प्रतापनगर परिसरातील मोटरसायकल चोरी असे एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून २ लाख ११ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ७ नोव्हेंबर रोजी सत्यशील सप्रे यांनी धंतोली पोलीस ठाण्यात घरफोडीची तक्रार दाखल केली होती. त्यांच्या नातेवाईक अलका सचिन जोग या पुण्याला गेल्या असताना ६ ते ७ नोव्हेंबरदरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती. याच दिवशी प्रियंका नंदन वर्णेकर यांनीही दुसरी तक्रार दाखल केली. त्यांच्या आई सुनंदा मधुकर जोशी या पुण्याला गेल्या असताना चोरट्यांनी त्यांच्या घराचे दार तोडून रोख रक्कम लंपास केली होती. या दोन्ही घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली होती.

डॉक्टर कॉलनी परिसरातून तीन संशयितांना ताब्यात

या घरफोडी प्रकरणांचा तपास सुरू असताना धंतोली पोलिसांच्या डीबी पथकाला डॉक्टर कॉलनी परिसरात तीन संशयित व्यक्ती आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता अल्ताफ महम्मद युसूफ मनसुरी, अक्षय दिलीप भैसारे आणि सुरज विवेकनाथ खंडारे अशी त्यांची नावे समोर आली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी दोन्ही घरफोड्यांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

घरफोडीपुरतेच नव्हे, वाहन चोरीचेही गुन्हे उघड

आरोपींची पोलीस कोठडीत चौकशी केली असता धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ऑटो रिक्षा चोरीचा गुन्हाही उघडकीस आला. पोलिसांनी चोरीची रिक्षा जप्त केली. याशिवाय बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पल्सर मोटरसायकल चोरी आणि आर.पी. नगर अर्थात प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोटरसायकल चोरीचाही छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.

या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी एकूण २ लाख ११ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, नागपूर शहरातील अन्य पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या चोरीच्या घटनांमध्येही त्यांचा सहभाग आहे का, याचा तपास केला जाणार आहे. त्यासाठी संबंधित पोलीस ठाण्यांकडूनही त्यांची चौकशी करण्यात येणार आहे.

धंतोली पोलिसांच्या डीबी पथकाची कामगिरी

ही कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात धंतोली पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने केली. बंद घरांना लक्ष्य करून चोरी करणाऱ्या आरोपींचा पर्दाफाश झाल्याने शहरातील घरफोडी आणि वाहन चोरीच्या इतर घटनांचे धागेदोरेही हाती लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास धंतोली पोलीस करीत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button