
१४ नोव्हेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय व दादासाहेब गवळी चॅरिटेबल ट्रस्टचा विशेष सोहळा; सोनम वांगचुक आणि गीतांजली वांगचुक तरुणांना करणार मार्गदर्शन
नागपूर : विश्वमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने नागपुरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १४ नोव्हेंबर रोजी पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. सोनम वांगचुक यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आणि दादासाहेब गवळी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या आयोजनासंदर्भात आयोजकांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दादासाहेब गवळी चॅरिटेबल ट्रस्ट आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. कीर्ती अर्जुन यांनी कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली.
या सोहळ्याला पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. सोनम वांगचुक यांच्यासह गीतांजली वांगचुक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी दोन्ही मान्यवर आजच्या तरुण पिढीशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक परिवर्तनाचे विचार आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व यांची सांगड घालत तरुणांमध्ये सकारात्मक विचारांची रुजवण करण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे.
विशेष म्हणजे, या कार्यक्रमासाठी पाच ते सहा हजार नागरिकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी आणि तरुण या सोहळ्याला उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण, मान्यवरांचे मार्गदर्शन आणि सामाजिक तसेच पर्यावरणविषयक विचारांचा जागर यामुळे १४ नोव्हेंबरचा हा कार्यक्रम विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून महामानवांच्या विचारांचा वारसा आणि पर्यावरण रक्षणाची जबाबदारी नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला आहे.



