लाखो रुपये खर्चूनही कोल्हापुरी बंधाऱ्यात जलसाठा शून्य!

गुंडरी वांडे येथील बंधाऱ्याचे काम निकृष्ट असल्याचा सारंग झाडे यांचा आरोप; दोषी कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी
पारशिवनी (नागपूर) : शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे आणि भूजल पातळीत वाढ व्हावी, या उद्देशाने शासनाकडून लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या गुंडरी वांडे येथील कोल्हापुरी बंधाऱ्याची अवस्था आता चर्चेचा विषय ठरली आहे. लाखो रुपये खर्च करूनही या बंधाऱ्यात पाण्याचा साठा होत नसल्याचा आरोप शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हा प्रतिनिधी सारंग झाडे यांनी केला आहे. बंधाऱ्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करत त्यांनी संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सारंग झाडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे या प्रकरणाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, गुंडरी वांडे येथे उभारण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याला पाणी अडवण्यासाठी दरवाजे बसविण्यात आले आहेत. मात्र, प्रत्यक्षात या बंधाऱ्यात जलसाठा निर्माण होत नसल्याने बांधकामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे, नागरिक आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेले लोखंडी सुरक्षा कठडेही अद्याप बसविण्यात आलेले नाहीत. असे असताना संबंधित कामाला पूर्णत्वाचे प्रमाणपत्र कसे देण्यात आले, असा सवाल झाडे यांनी उपस्थित केला आहे.

या बंधाऱ्याचा मुख्य उद्देश परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणे हा होता. मात्र, जलसाठाच होत नसल्याने या योजनेचा अपेक्षित लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्या रब्बी हंगाम सुरू असून गहू आणि हरभरा यांसारखी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याची गरज आहे. मात्र, बंधाऱ्यात पाणी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असून आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी
या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सारंग झाडे यांनी केली आहे. बंधाऱ्याच्या बांधकामाचा दर्जा, मंजूर निधी, प्रत्यक्ष खर्च आणि काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया यांची सखोल तपासणी करावी, असे त्यांनी म्हटले आहे. चौकशीत दोषी आढळणारे कंत्राटदार, अभियंते आणि संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय बंधाऱ्यावर नागरिकांच्या सुरक्षेसाठी लोखंडी कठडे तातडीने बसवावेत, जलसाठा निर्माण होण्यासाठी आवश्यक तांत्रिक उपाययोजना कराव्यात आणि निकृष्ट कामामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून त्यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही प्रसिद्धीपत्रकातून करण्यात आली आहे.
अन्यथा आंदोलनाचा इशारा
शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विकासकामांमध्ये भ्रष्टाचार आणि अधिकाऱ्यांची निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा सारंग झाडे यांनी दिला आहे. जनतेच्या पैशातून उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पांचा प्रत्यक्ष फायदा नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन चौकशी व दोषींवर कारवाई न केल्यास शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, या बंधाऱ्याच्या कामाबाबत करण्यात आलेल्या आरोपांची अधिकृत चौकशी आणि संबंधित विभागाची भूमिका अद्याप समोर आलेली नाही.



