आयटी कर्मचाऱ्याला सायबर चोरट्यांचा ५.९१ लाखांचा गंडा!

दोन दिवसांत चार वेगवेगळ्या बँक खात्यांतून रक्कम लंपास; जरीपटका पोलिसांत गुन्हा दाखल, ट्रान्झॅक्शन आयडीच्या आधारे तपास सुरू
नागपूर : सायबर चोरट्यांनी आता थेट बँक खात्यांनाच लक्ष्य केल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. नागपूरच्या जरीपटका परिसरातील एका आयटी कर्मचाऱ्याच्या चार वेगवेगळ्या बँक खात्यांतून अवघ्या दोन दिवसांत तब्बल ५ लाख ९१ हजार ९०० रुपये ऑनलाइन पद्धतीने परस्पर काढून घेण्यात आले. भारत विनायक वालदे (वय ३३) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे सायबर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारत वालदे हे इंदोरा चौक परिसरातील नगुवेतन कॉलनी येथे वास्तव्यास असून एका आयटी कंपनीत कार्यरत आहेत. त्यांचे बहुतांश आर्थिक व्यवहार ऑनलाइन पद्धतीने होतात. याचाच फायदा घेत अज्ञात सायबर चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यांना लक्ष्य केले.

५ नोव्हेंबर ते ६ नोव्हेंबर २०२६ या दोन दिवसांच्या कालावधीत अज्ञात व्यक्तीने त्यांच्या ॲक्सिस बँक, आयडीबीआय बँक, सर्व्हस बँक आणि कोटक महिंद्रा बँक या चार वेगवेगळ्या बँक खात्यांतून ऑनलाइन व्यवहार करत एकूण ५ लाख ९१ हजार ९०० रुपये काढून घेतले. खात्यांमधून मोठ्या प्रमाणात रक्कम गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर भारत वालदे यांनी जरीपटका पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी अपराध क्रमांक ८२०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६सी आणि ६६डी अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मोबाईल किंवा सिस्टीम हॅक झाल्याचा संशय
प्राथमिक माहितीनुसार, फिर्यादींच्या मोबाईलमध्ये अनेक ॲप्स असल्याचे तसेच सिस्टीमचे ऑटोमॅटिक अपडेट होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मोबाईल किंवा सिस्टीम हॅक करून आर्थिक फसवणूक करण्यात आली असावी, अशी शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे. चारही बँक खात्यांमधून झालेल्या व्यवहारांचे ट्रान्झॅक्शन आयडी तपासून पैसे नेमके कुठे वळवण्यात आले, याचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना ऑनलाइन व्यवहार करताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. मोबाईलवर येणाऱ्या अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, संशयास्पद ॲप्स डाउनलोड करू नयेत आणि अनधिकृत अपडेट्सपासून सावध राहावे. तसेच बँक खात्याशी जोडलेला मोबाईल नंबर आणि त्याची सुरक्षितता जपावी, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
डिजिटल व्यवहार वाढत असताना सायबर चोरट्यांकडून नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे एका चुकीच्या लिंकमुळे किंवा असुरक्षित ॲपमुळे आयुष्यभराची कमाई धोक्यात येऊ शकते, हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.



