citynewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

दारू पिण्यास नकार दिल्याने तरुणावर चाकूहल्ला; दोघांविरुद्ध पाचपावलीत गुन्हा दाखल!

शिवीगाळीनंतर वादाचे हिंसक रूप; छाती व पाठीवर चाकूने वार करून तरुणाला जखमी केल्याचा आरोप, मेयो रुग्णालयात उपचारानंतर पोलिसांत तक्रार

नागपूर : दारू पिण्यास नकार दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून दोन तरुणांनी एका युवकावर चाकूने हल्ला केल्याची घटना पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या हल्ल्यात युवकाच्या छातीवर आणि पाठीवर चाकूने वार करून त्याला जखमी करण्यात आल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. या प्रकरणी करण आणि प्रेम या दोन भावांविरुद्ध पाचपावली पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख फरीद शेख इकबाल (वय २६) यांची आरोपी करण अनिल मेघ्राम (वय २३) आणि प्रेम अनिल मेघ्राम (वय २०) यांच्याशी ओळख होती. ८ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास बाबा बुद्धनगर, धर्मदास डोंगरे यांच्या घराजवळ ही घटना घडली.

घटनास्थळी असताना आरोपी क्रमांक एकने फिर्यादीला बोलावून दारू पिण्यास सांगितले. मात्र, फिर्यादीने दारू पिण्यास नकार दिला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर आरोपी क्रमांक एकने फिर्यादीला शिवीगाळ का करतो, असे म्हणत हातबुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान, आरोपी क्रमांक दोनने जवळील चाकू काढून फिर्यादीच्या छातीवर वार केला. तसेच आरोपी क्रमांक एकनेही फिर्यादीच्या पाठीवर चाकूने वार करून त्याला जखमी केल्याचा आरोप आहे.

मेयो रुग्णालयातील उपचारानंतर पोलिसांत तक्रार

हल्ल्यात जखमी झालेल्या फिर्यादीने मेयो रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर ११ नोव्हेंबर रोजी पाचपावली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा क्रमांक ८६७/२०२६ अन्वये दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

दारू पिण्यास नकार दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट चाकूहल्ल्यात झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पाचपावली पोलीस करीत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button