AccidentNewscitynewsDharaShivMaharashtra

धाराशिवमध्ये भीषण अग्नितांडव! किराणा दुकानाला आग लागून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

येडशी गावात मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास दुर्घटना; दुकानाच्या वरच्या मजल्यावरील घरात झोपलेल्या कुटुंबाला सावरण्याची संधीही मिळाली नाही, एक तरुण बचावला

धाराशिव : धाराशिव तालुक्यातील येडशी गावात मध्यरात्री एका किराणा दुकानाला भीषण आग लागून एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या या आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. दुकानाच्या वरच्या मजल्यावर असलेल्या घरात कुटुंबातील सदस्य झोपलेले असताना ही दुर्घटना घडली. या भीषण अग्नितांडवातून कुटुंबातील एका तरुणाला मात्र स्वतःचा जीव वाचवण्यात यश आले असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येडशी गावात गोविंद करांडे यांचे ‘करांडे किराणा अँड जनरल स्टोअर’ नावाने किराणा दुकान आहे. या दुकानाच्या वरच्या मजल्यावर करांडे कुटुंब वास्तव्यास होते. घटनेच्या रात्री कुटुंबातील सदस्य घरात झोपलेले असताना रात्री सुमारे २.३० वाजताच्या सुमारास दुकानाला अचानक आग लागली. दुकानातील प्लास्टिकच्या वस्तू आणि तेलाचे डबे यांसारख्या ज्वलनशील साहित्यामुळे आगीने अल्पावधीतच भीषण स्वरूप धारण केले.

आगीच्या ज्वाळा वेगाने पसरल्याने वरच्या मजल्यावरील घरात झोपलेल्या कुटुंबीयांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी चार जणांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला, तर खाली येऊन स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अन्य दोघांचा आगीच्या विळख्यात सापडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कुटुंबातील एका तरुणाने मात्र या भीषण दुर्घटनेतून आपला जीव वाचवला.

या घटनेबाबत धाराशिवच्या पोलीस अधीक्षक ऋतु खोकर यांनी माहिती देताना सांगितले की, धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येडशी गावात किराणा दुकान आणि त्यावरील घराला मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. दुकानात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचे साहित्य आणि तेलाचे डबे असल्याने आग झपाट्याने पसरली. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून, कुटुंबातील एक तरुण बचावला आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.

या घटनेमुळे संपूर्ण येडशी गावावर शोककळा पसरली असून, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मध्यरात्री घडलेल्या या भीषण अग्नितांडवाने गावातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. या दुर्घटनेचा पुढील तपास धाराशिव ग्रामीण पोलीस करीत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button