citynewsCrime NewsDharaShivMaharashtra

प्रेमसंबंधाच्या संशयातून तरुणाची निर्घृण हत्या; मित्रालाही बेदम मारहाण

चहाच्या टपरीवरून तरुणांना जबरदस्तीने वाहनात कोंबून शेतात नेले; अमीर पटेलचा मृत्यू, अरबाज सय्यद गंभीर जखमी; सहा जणांविरुद्ध गुन्हा, दोघे पोलिसांच्या ताब्यात

धाराशिव : प्रेमसंबंधाच्या संशयातून निर्माण झालेल्या वादाने हिंसक वळण घेतल्याची धक्कादायक घटना धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर शहरात उघडकीस आली आहे. चहा पिण्यासाठी टपरीवर बसलेल्या दोन तरुणांना काही जणांनी जबरदस्तीने वाहनात बसवून शहराबाहेरील शेतात नेले आणि तिथे बेदम मारहाण केली. या अमानुष मारहाणीत अमीर जब्बार पटेल या तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याचा मित्र अरबाज अफसर सय्यद गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे तुळजापूर शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अरबाज सय्यद हा नेहमीप्रमाणे तुळजापूर शहरातील एका चहाच्या टपरीवर बसला होता. यावेळी काही व्यक्ती तेथे आल्या आणि त्यांनी अरबाजसह त्याचा मित्र अमीर पटेल यांना जबरदस्तीने वाहनात बसवले. त्यानंतर दोघांना शहरापासून दूर असलेल्या शिंदे महाराज यांच्या शेतात नेण्यात आले. तेथे एका मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून दोघांनाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.

विशेष म्हणजे, या विषयावर यापूर्वीही दोन्ही बाजूंमध्ये चर्चा झाली होती. संबंधित तरुणाला समज देण्यात आली होती आणि वाद मिटल्याचे अरबाजने सांगितल्याची माहिती आहे. मात्र, पुन्हा एकदा त्याच संशयातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. मुलीला त्रास दिल्याच्या तक्रारीवरून यापूर्वी दोन्ही बाजूंच्या व्यक्तींची बैठक झाली होती. त्यानंतरही पुन्हा वाद निर्माण झाल्याने मुलीच्या बाजूच्या नातेवाईकांसह काही व्यक्तींनी दोघांना लक्ष्य केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

अरबाजने दिलेल्या माहितीनुसार, शेतात अनेक जणांनी त्याच्यावर आणि अमीरवर बेदम हल्ला केला. मारहाणीदरम्यान अरबाजला चक्कर येऊन तो खाली कोसळला, तरीही हल्लेखोरांनी मारहाण सुरूच ठेवली. या हल्ल्यात अमीर पटेलचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर अरबाजचाही मृत्यू झाला असावा, असा समज करून हल्लेखोरांनी त्याला तुळजापूरमधील एका पार्किंग परिसरात टाकून दिल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तुळजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या अरबाजला तातडीने धाराशिव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेत अमीरचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी सहा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी चार जणांची नावे निष्पन्न झाली असून अन्य दोघांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना केली आहेत. तसेच, तरुणांना घेऊन जाण्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहनाचाही शोध घेतला जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button