citynewsCrime NewsYavatmal

यवतमाळमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये लाखोंची धाडसी चोरी!

मध्यरात्री भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांचा प्रवेश; तिजोरी गॅस कटरने फोडून सहा लाखांची रोकड लंपास

दुर्गेश कान्हु, यवतमाळ : चोरट्यांनी थेट बँकेलाच लक्ष्य करत सुरक्षाव्यवस्थेला आव्हान दिल्याची खळबळजनक घटना पाटण येथे उघडकीस आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या पाटण शाखेची मागील भिंत फोडून चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला. त्यानंतर वजनदार तिजोरी ओढत बाहेर आणली आणि गॅस कटरच्या साहाय्याने फोडून त्यातील सुमारे सहा लाख रुपयांची रोकड लंपास केली. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली.

प्राथमिक माहितीनुसार, चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास बँकेच्या मागील बाजूच्या भिंतीला मोठे भगदाड पाडले. त्यातून आत प्रवेश केल्यानंतर त्यांनी बँकेतील तिजोरी बाहेर काढली. तिजोरी बँकेच्या बाहेर आणून गॅस कटरच्या साहाय्याने फोडण्यात आली. त्यातील सुमारे सहा लाख रुपयांची रोकड घेऊन चोरटे पसार झाले. सकाळी बँक उघडल्यानंतर भिंतीला पडलेले भगदाड आणि आतील अस्ताव्यस्त स्थिती पाहून चोरीचा प्रकार उघडकीस आला.

पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांनी घटनास्थळी भेट दिली. वणी, मुकुटबन, शिरपूर आणि पांढरकवडा पोलीस ठाण्यांचे अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पाहणी करून तपासाची दिशा निश्चित केली असून, चोरट्यांचा माग काढण्यासाठी अनेक पथके रवाना करण्यात आली आहेत.

११ वर्षांपूर्वीही याच शाखेत चोरी

या घटनेतील विशेष बाब म्हणजे, तब्बल ११ वर्षांपूर्वी याच बँक शाखेत अशाच प्रकारची चोरी झाली होती. त्यामुळे जुन्या घटनेचा आणि आताच्या चोरीचा काही संबंध आहे का, याचाही तपास केला जाणार आहे. भिंतीला भगदाड पाडणे, तिजोरी बाहेर काढणे आणि गॅस कटरने ती फोडणे, या संपूर्ण प्रकारावरून चोरीसाठी पूर्वनियोजन करण्यात आले असावे, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

बँकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

बँकेची भिंत फोडून चोरट्यांनी थेट तिजोरीपर्यंत मजल मारल्याने बँकांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चोरीच्या वेळी चोरट्यांनी किती वेळ बँकेत घालवला, या गुन्ह्यात किती जण सहभागी होते आणि त्यांनी कोणती साधने वापरली, याचा उलगडा पोलीस तपासातून होणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या देखरेखीखाली तपास सुरू असून, या धाडसी चोरीचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button