Accident Newsamravaticitynews

पंचवटी फ्लायओव्हरवर ओला मोपेडला अज्ञात वाहनाची धडक; विवाहितेचा मृत्यू

डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने २९ वर्षीय महिलेचा मृत्यू; दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या कुटुंबावर शोककळा

अमरावती : दिवाळीच्या उत्साहात अमरावती शहरात भीषण अपघाताची घटना घडली. पंचवटी चौकातील फ्लायओव्हरवर मंगळवारी सायंकाळी अज्ञात वाहनाने ओला मोपेडला धडक दिली. या अपघातात मोपेडवर मागे बसलेल्या २९ वर्षीय विवाहितेचा रस्त्यावर पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला. दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या दाम्पत्याच्या आनंदावर या घटनेने विरजण पडले.

निकिता रामदास काकडे (विवाहानंतर गावंडे, वय २९, रा. गुरुदेव कॉलनी) असे मृत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निकिता मंगळवारी सायंकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास पतीसोबत ओला मोपेडवरून दिवाळीच्या खरेदीसाठी बाजाराकडे जात होत्या. त्यांची मोपेड पंचवटी चौकातील फ्लायओव्हरवर पोहोचली असता, अज्ञात वाहनाने तिला धडक दिली. धडकेमुळे मोपेडचा तोल गेला आणि मागे बसलेल्या निकिता रस्त्यावर पडल्या. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.

अपघातानंतर पतीने नागरिकांच्या मदतीने गंभीर जखमी निकिता यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही माहिती समजताच रुग्णालयात दाखल झालेल्या नातेवाइकांनी आक्रोश केला.

घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. फरार अज्ञात वाहनचालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून फ्लायओव्हर आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. मृत महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गाडगेनगर पोलीस करीत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button