Buldhanacitynews

शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी संजय रायमुलकर नदीपात्रात उतरले; बेमुदत उपोषणाला सुरुवात

पेनटाकळी प्रकल्पातून मेहकरच्या नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी; पाणी मिळेपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा माजी आमदारांचा निर्धार

मेहकर, बुलढाणा : पावसाच्या अनियमिततेमुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाल्यानंतर आता तूर पिकावरही संकट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पेनटाकळी प्रकल्पातून मेहकरच्या नदीपात्रात पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेना (शिंदे गटाचे) माजी आमदार संजय रायमुलकर यांनी २ नोव्हेंबरपासून नदीपात्रात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असतानाही नदीपात्रात पाणी सोडण्यास विलंब केला जात असल्याचा आरोप रायमुलकर यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याची गरज असताना प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन पाणी सोडावे, अशी त्यांची मागणी आहे. जोपर्यंत नदीपात्रात पाणी सोडले जात नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.

दरम्यान, पावसाच्या लहरीपणामुळे यंदा शेतकऱ्यांचे सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात बाधित झाले आहे. आता तूर पिकालाही पाण्याची आवश्यकता असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे पेनटाकळी प्रकल्पातील पाण्याचे नियोजन आणि नदीपात्रात पाणी सोडण्याचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

या पार्श्वभूमीवर सिटी न्यूजचे प्रतिनिधी गजानन राऊत यांनी मेहकर येथील नदीपात्रातून माजी आमदार संजय रायमुलकर यांच्याशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याची सद्यस्थिती, प्रकल्पातील पाणीसाठा आणि प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही याबाबत माहिती जाणून घेण्यात आली.

प्रतिनिधी : गजानन राऊत, सिटी न्यूज, मेहकर-बुलढाणा

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button