भोकरच्या SBI बँक दरोड्याचा मास्टरमाइंड बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक!

३० ते ३५ कोटींचे सोने आणि लाखोंची रोकड लुटली; ग्रामस्थांच्या सतर्कतेने चारही दरोडेखोर जेरबंद, २०२३ मध्येही टाकला होता बँकेवर दरोडा
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील भोकर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेवर पडलेल्या कोट्यवधींच्या दरोड्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. शनिवारी दुपारी चार सशस्त्र दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश करून कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत तब्बल ३० ते ३५ कोटी रुपयांचे सोने आणि १४ ते १५ लाख रुपयांची रोकड लुटली. विशेष म्हणजे, बँकेतून पळ काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या चारही आरोपींना ग्रामस्थ आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात यश आले. या प्रकरणाच्या तपासात आणखी धक्कादायक बाब समोर आली असून, या दरोड्याचा मुख्य सूत्रधार दुसरा-तिसरा कोणी नसून बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक असल्याचे उघड झाले आहे.
मास्क आणि हेल्मेट घालून बँकेत प्रवेश
जळगाव तालुक्यातील भोकर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत शनिवारी दुपारी ग्राहकांची वर्दळ कमी असल्याची संधी साधून चार दरोडेखोरांनी प्रवेश केला. चेहऱ्यावर मास्क आणि डोक्यावर हेल्मेट घालून आलेल्या या आरोपींनी बँकेतील कॅशियर आणि मॅनेजरला बंदुकीचा धाक दाखवला. त्यानंतर बँकेतील तब्बल १६ लॉकर उघडण्यास भाग पाडले. या लॉकरमधील ग्राहकांचे सोने आणि बँकेतील रोकड असा मोठा ऐवज घेऊन आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला.
कर्मचाऱ्यांना मारहाण; गोळीबारही केल्याची माहिती
दरोड्यादरम्यान बँकेतील कर्मचाऱ्यांना शस्त्रांचा धाक दाखवून दहशत निर्माण करण्यात आली. एका कर्मचाऱ्याने अलार्मचे बटण दाबण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी त्याला पकडून मारहाण केली आणि त्याचे हात बांधून ठेवले. एका कर्मचाऱ्याने आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही मारहाण करण्यात आली. आरोपींनी गोळीबार केल्याची माहिती बँकेतील कर्मचाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे या दरोड्याचे गांभीर्य अधिक वाढले आहे.
ग्रामस्थांच्या मदतीने चारही आरोपी जेरबंद
दरोडा टाकल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी तत्परता दाखवत चारही आरोपींना पकडले. पोलिसांनी आरोपींकडून दरोड्यात वापरलेले साहित्य तसेच लुटीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. प्राथमिक माहितीनुसार, बँकेतून सुमारे २७ किलो सोने लुटण्यात आले होते. दरोड्यातील पाच बॅगा पोलिसांनी जप्त केल्या असून, सोन्याचे दागिने आणि रोकड यांची मोजणी व पडताळणी सुरू आहे.
बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक निघाला मुख्य सूत्रधार
या दरोड्यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे टोळीचा मास्टरमाइंड बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक शंकर रमेश जासक असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने या दरोड्याचा कट रचल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणात शंकर रमेश जासक, गजानन राजेंद्र पवार, अंकुश रावण चव्हाण आणि अंकुश तुळशीराम चव्हाण या चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
२०२३ मध्येही टाकला होता ३ कोटी १७ लाखांचा दरोडा
मुख्य आरोपी शंकर जासक याचा यापूर्वीही अशाच प्रकारच्या गुन्ह्यात सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. २०२३ मध्ये जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या स्टेट बँकेच्या शाखेत त्याने आपल्या नातेवाईकाच्या मदतीने तब्बल ३ कोटी १७ लाख रुपयांचा दरोडा टाकल्याचा आरोप आहे. या गुन्ह्यानंतर त्याला अटक करून कारागृहात ठेवण्यात आले होते. मात्र, दोन ते तीन महिन्यांपूर्वी तो जामिनावर बाहेर आल्याची माहिती आहे.
कारागृहातच रचला नव्या दरोड्याचा कट?
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, कारागृहात असताना शंकर जासक याची गजानन पवार याच्याशी ओळख झाली होती. गजानन पवार हा त्याच्या प्रेयसीच्या पतीच्या खून प्रकरणात कारागृहात होता. तोदेखील काही महिन्यांपूर्वी जामिनावर बाहेर आला होता. कारागृहातील ओळखीतून या दोघांमध्ये संपर्क वाढला आणि त्यातूनच भोकर येथील बँक दरोड्याचा कट रचण्यात आल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.
टोळीचे आणखी कारनामे उघड होणार?
भोकर येथील बँक दरोडा प्रकरणात चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात असले तरी या टोळीचे आणखी काही साथीदार आहेत का, दरोड्याची योजना नेमकी कशी आखण्यात आली आणि यापूर्वीही त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा तपास पोलीस करीत आहेत. जप्त करण्यात आलेल्या सोन्याचे आणि रोकडचे मूल्य निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बँकेतील सुरक्षाव्यवस्था, आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्यांनी पुन्हा दरोड्याचा कट कसा रचला, या सर्व बाबींचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे.



