बच्चू कडूंचा आक्रमक पवित्रा; फायनान्स कंपनीने घराला लावलेले सील तोडले!

देऊरवाडीतील कर्जप्रकरणी मजूर कुटुंबाला दिला घरात प्रवेश; ५ लाख ९ हजारांचे कर्ज दाखवून खात्यात केवळ २ लाख ७० हजार जमा झाल्याचा आरोप
यवतमाळ | दुर्गेश कान्हु
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील देऊरवाडी येथे कर्जवसुलीच्या पद्धतीवरून गंभीर प्रश्न उपस्थित करणारे प्रकरण समोर आले आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी मजूर रवी संजय पत्रे यांच्या राहत्या घराला सील लावण्यात आले होते. या प्रकरणाची माहिती मिळताच प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेत देऊरवाडी येथे धाव घेतली. त्यांनी घराला लावलेले सील तोडून पत्रे कुटुंबाला पुन्हा घरात प्रवेश मिळवून दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, रवी संजय पत्रे यांनी घरासाठी मोतीलाल ओसवाल फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. मात्र, या कर्जाच्या व्यवहारात मोठी आर्थिक तफावत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. कागदोपत्री ५ लाख ९ हजार रुपयांचे कर्ज दाखवण्यात आले असताना प्रत्यक्षात त्यांच्या बँक खात्यात केवळ २ लाख ७० हजार रुपये जमा झाले. म्हणजेच मंजूर कर्जाची रक्कम आणि प्रत्यक्ष खात्यात जमा झालेली रक्कम यामध्ये तब्बल २ लाख ३९ हजार रुपयांची तफावत असल्याचे सांगण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, रवी पत्रे यांनी कर्जाचे दहा हप्ते नियमितपणे भरल्याचे सांगितले जात असतानाही फायनान्स कंपनीकडून चार लाख रुपये थकबाकी दाखवण्यात आल्याचा आरोप आहे. यापूर्वी एक लाख रुपये भरल्यानंतरही तीन लाख ९० हजार रुपये बाकी असल्याचे कंपनीकडून दर्शवण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर थकबाकीच्या कारणावरून त्यांच्या राहत्या घराला सील लावण्यात आले. त्यामुळे पत्रे कुटुंबावर मोठे संकट ओढवले होते.
या अन्यायाची माहिती मिळाल्यानंतर बच्चू कडू यांनी थेट देऊरवाडी गाठत या प्रकरणात हस्तक्षेप केला. त्यांनी घराला लावलेले सील तोडून कुटुंबाला घरात प्रवेश मिळवून दिला. या घटनेमुळे परिसरात एकच चर्चा सुरू झाली असून, कर्जवसुलीच्या नावाखाली सामान्य कुटुंबांची घरे सील करण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पाच लाखांचे कर्ज, खात्यात अडीच लाखांपेक्षा कमी रक्कम आणि दहा हप्ते भरल्यानंतरही लाखोंची थकबाकी नेमकी कशी? असा सवाल या प्रकरणातून उपस्थित होत आहे. कर्जाची प्रत्यक्ष वितरित रक्कम, भरलेले हप्ते आणि कंपनीने दाखवलेली थकबाकी यांचा हिशेब स्पष्ट होणे आवश्यक आहे. या संपूर्ण प्रकरणावर मोतीलाल ओसवाल फायनान्स कंपनी काय भूमिका मांडते, तसेच संबंधित यंत्रणा याची दखल घेऊन चौकशी करणार का, याकडे आता देऊरवाडी परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



